पावसाळ्याचा जून महिना संपला आणि जुलैचा मध्यान्हही संपायला आला, तरीही विदर्भावर पावसाची वक्रदृष्टी अजूनही कायमच आहे. गेले तीन दिवस सारखा उन्हं-पावसाचा लपंडाव सुरू आहे. सकाळच्या सुमारास ढगाळलेल्या वातावरणाने वैदर्भीयांच्या अपेक्षा वाढतात, हलकासा पाऊसही पडतो आणि दुपारी पुन्हा लख्ख उन्हं पडते. उन्हं-पावसाचा हा लपंडाव अजून एक आठवडा तरी असाच राहणार आणि एक आठवडय़ाने मान्सून सक्रिय होऊ शकतो, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
साधारणपणे २४ जूनपर्यंत मान्सून सक्रिय होतो. यावेळी मात्र जुलैचा मध्यान्ह उजाडला तरीही मान्सून सक्रिय होण्याची काहीही चिन्हे नाहीत. हलकासा पाऊस अधूनमधून दर्शन देऊन जातो, पण तो मान्सून नाही. बंगालच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. या पट्टय़ामुळे निर्माण झालेले ढग आणि जपानजवळ सायक्लोन तयार झाल्यामुळे ढग इकडे खेचले गेले. मात्र, महाराष्ट्रात अजूनही मान्सून सक्रिय झालेला नाही. एक आठवडय़ापर्यंत तरी तो सक्रिय होण्याची काहीही चिन्हे नाहीत, असे ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष व हवामान अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.
भारतानेच नव्हे तर संपूर्ण जगाने यावर्षी सुरुवातीलाच अलनिनोच्या प्रभावामुळे पावसावर त्याचा परिणाम होणार असे भाकित वर्तवले होते. सध्यातरी हे भाकित खरी होण्याची चिन्हे दिसत आहेत. विदर्भात एकूण पावसाळ्यात पावसाचे प्रमाण सरासरी १२०० मि.मी. इतके आहे. एरवी जूनच्या मध्यापर्यंत पाऊस सक्रिय होऊन जातो. जूनमध्ये १५० ते २०० मि.मी. पाऊस तर जुलैमध्ये २५० ते ३०० मि.मी. पाऊस पडतो. यावेळी मुळातच पावसाची सुरुवात झालेली नाही. ही स्थिती जुलै महिन्यापर्यंत अशीच कायम राहिल्यास आणि एक आठवडय़ानंतर मान्सून सक्रिय झाल्यास, साधारणपणे ८०० मि.मी. इतका पाऊस होण्याची शक्यता आहे. ६०० ते ८०० मि.मी. इतका पाऊस झाल्यास विदर्भाला पुन्हा एकदा दुष्काळाला सामोरे जावे लागेल.
गेल्या ५० वषार्ंत पहिल्यांदाच जुलैच्या मध्यान्हापर्यंत मान्सून सक्रिय न होण्याची स्थिती उद्भवली आहे. यावेळी प्रथमच जून महिन्यात मान्सून सक्रिय न होण्याचा विक्रम झाला आहे. त्यामुळे उद्योग आणि शेतीवर परिणाम होणार असला तरीही, सर्वाधिक समस्या ही पिण्याच्या पाण्याची असणार आहे, असे प्रा. चोपणे म्हणाले.

Story img Loader