रोजच्या रोज घडय़ाळ्याच्या काटय़ावर धावणाऱ्या मुंबईकरांना धकाधकीच्या आयुष्यातून थोडी उसंत म्हणून येत्या डिसेंबरमध्ये मरिन ड्राइव्हच्या समुद्रकिनाऱ्यावर आगळ्यावेगळ्या अशा ड्रॅगन बोटींच्या स्पर्धेचा थरार अनुभवायला मिळणार आहे. ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी ) या पवईतील नामवंत अभियांत्रिकी शिक्षणसंस्थेच्या ‘मूड इंडिगो’ (मूड आय) या बहुचर्चित सांस्कृतिक महोत्सवात पहिल्यांदाच बोटींच्या स्पर्धेचा समावेश करण्यात आला आहे. या २०० मीटरच्या बोटींच्या स्पर्धेत देशभरातील विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे.
ड्रॅगन बोटीवरूनच ती चीनचे वैशिष्टय़ असल्याची कल्पना येते. ड्रॅगन बोटीची वैशिष्टय़पूर्ण स्पर्धा चीनमध्ये आयोजिली जाते. या स्पर्धेकरिता आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी खास चीनहून वैशिष्टय़पूर्ण बोटी मागविल्या आहेत. ही बोट १२ मीटर लांब असून कापराच्या लाकडापासून बनविली आहे. यात एकावेळी दहा जण बसू शकतात. बोट वल्हविणाऱ्यांबरोबरच एक ढोलवादकही यात असतो. स्पर्धा सुरू असताना हा ढोलवादक लयीत ढोल वाजवित असतो. ढोलाच्या लयीवर ही स्पर्धा पार पडते. त्यामुळे, खेळाच्या थराराबरोबरच ती पाहताना एक वेगळीच मजा दर्शकांना येते. बोटीचे तोंड ड्रॅगनच्या आकाराचे असल्याने तिला ड्रॅगन बोट म्हटले जाते.
ड्रॅगन बोट स्पर्धेचे वैशिष्टय़ म्हणजे ज्यांना बोटी चालविण्याचा अनुभव नाही, अशा विद्यार्थ्यांनाही यात सहभागी होता येईल. अशा अनुनभवी विद्यार्थ्यांना आयोजकांतर्फे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची पुरेशी काळजी आयोजकांतर्फे घेण्यात येणार आहे. मुंबई, पुणे, भोपाळ, अहमदाबाद, नाशिक, इंदूर, नागपूर या भागातून विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होतील. विद्यार्थ्यांना या स्पर्धेत कोणतेही शुल्क न भरता सहभागी होता येईल. स्पर्धेत बाजी मारणाऱ्या टीमला ५१ हजार रुपयांचे भरघोस बक्षीस दिले जाणार आहे. या स्पर्धेत देशभरातून १०० टीम सहभागी होतील, असा अंदाज ‘मूड आय’च्या आयोजक टीमपैकी असलेल्या पार्थ लोया या विद्यार्थ्यांने व्यक्त केला. डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात ही स्पर्धा होणार आहे.
‘मूड इंडिगो’ची यंदाची थीम आहे, ‘ओरिएंटल क्वेस्ट’. या थीमला अनुसरून पूर्वेकडील देशांमधील संस्कृतीचे दर्शन घडविण्याचा आयोजक विद्यार्थ्यांचा विचार आहे. बोटींची ही स्पर्धा देखील याचाच एक भाग असल्याचे ‘मूड इंडिगो’च्या ‘स्टुडंट्स अॅक्टिव्हीटी’चा प्रतिनिधी अभिनव शर्मा याने सांगितले. या बोट स्पर्धेबरोबरच पूर्वेकडील देशांमधील कला व संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या अनेक कार्यक्रमांचा सहभाग यंदाच्या मूड आयमध्ये करण्यात आला आहे.
स्पर्धेच्या नोंदणीसाठी संपर्क – http://www.moodi.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा