निसर्ग संपन्न आणि इको सेन्सीटीव्ह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदगड तालुक्यात उभारण्यात येणाऱ्या एव्हीएच या विषारी रसायनांची निर्मिती करणाऱ्या कारखान्याच्या विरोधात शुक्रवारी तालुक्यातील सर्व पक्षीय नागरिकांचा प्रक्षोभ उसळून आला. कारखाने निमिर्तीस विरोध करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला असता संतप्त आंदोलकांनी कार्यालयाची प्रचंड नासधूस केली. तसेच जनरेटर पेटवून दिला.
 तासाहून अधिक काळ आंदोलकांचा हल्लाबोल सुरु होता. कारखान्यासमोर झालेल्या सभेवेळी आंदोलकांचे नेते निवृत्त न्या. बी. जी. कोळसे पाटील यांनी प्रकल्पा विरुध्द लोकशाही मार्गाने लढा सुरु  राहणार असल्याचे स्पष्ट करुन उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, हा गोंधळ आंदोलकांनी केला की कारखाना व्यवस्थापनाच्या भाडोत्री लोकांनी यावरुन मतांतरे व्यक्त केली जात आहेत.
चंदगड तालुक्यातील हलकर्णी औद्योगिक वसाहतीमध्ये एव्हीएच केमिकल ही कंपनी उभारण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे चंदगडच्या नैसर्गिक सौंदर्यास बाधा होऊन पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे. प्रदुषणाचा धोका निर्माण होणार आहे. यामुळे या प्रकल्पास तालुक्यातील सर्वपक्षीय जनतेचा तीव्र विरोध आहे
हा विरोध दर्शविण्यासाठी भाटणे फ़ाटा येऊन शुक्रवारी सर्वपक्षीय मोर्चा निघाला. सामान्य नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी, ग्रामपंचायत सदस्य, दोन हजारावर महिला अशा सुमारे ८ ते १० हजार जणांचा मोर्चात समावेश होता.
निवृत्त न्या. बी. जी.कोळसे पाटील, माजी आमदार नरसिंगराव पाटील, उमेश पाटील, मनसे जिल्हाध्यक्ष दिवाकर पाटील, जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील, पंचायत समिती सभापती ज्योती पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तालुका अध्यक्ष कलावती पाटील, शेतकरी संघटनेचे एस. एम. कोले, प्रा. दीपक पाटील, एन. एस. पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्चा निघाला. मोर्चा कारखान्यासमोर पोहचल्यावर तेथे जोरदार निदर्शन करण्यात आली. कारखान्याला विरोध करणारी घोषणा बाजी होत राहिली.
आंदोलक सुरु असतानाच शेकडो लोक कारखान्याच्या आवारात घुसले. त्यांनी कार्यालय, वॉचमन केबीन याची प्रचंड नासधूस केली. आतील साहित्य, कागदपत्रे, फ़र्निचर उधळून लावले. हाताला येईल त्या वस्तूने मोडतोड केली जात होती. संतापलेल्या नागरिकांनी तेथील जनरेटरही पेटवून दिला. रुद्रावतार धारण केलेल्या लोकांना बी. जी. कोळसे पाटील व नागरिकांनी शांत केल्यावर गोंधळ संपुष्टात आला.
आंदोलनाच्या ठिकाणी चंदगड पोलिस ठाण्याचे पो.नि. अंकुश पवार व सहकारी होते. त्यांच्या डोळ्यासमोरच हा राडा सुरु असताना ते फ़ारसा प्रतिकार करु शकले नाहीत.

Story img Loader