अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या ही एका माणसाची हत्या नसून ती सामाजिक हत्या आहे. एखाद्या माणसाच्या विचारांचा जेव्हा प्रतिवाद करता येत नाही, समाज प्रबोधनाचे कार्य थांबवता येत नाही, अशा वेळेला त्याचा खून करून काही समाजकंटकांकडून सामाज सुधारणेत मोलाची कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींची हत्या केली जाते, याला इतिहास साक्षी आहे. परंतु अशा भेकड हत्या करूनही समाजप्रबोधनाचे काम कधीच थांबले नाही आणि थांबणार नाही. हा विचार घेऊन डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा निषेध करण्याकरीता ’महाराष्ट्र समिती’ या तरूणांच्या सामाजिक संघटनेच्यावतीने आज दादर येथे ’सामाजिक विचार हत्या निषेध मोर्चा’चे आयोजन करण्यात आले होते.
दादर येथील पोर्तुगीज चर्चजवळील प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुतळ्यापासून ते दादर चत्यभूमीपर्यंत काढण्यात आलेल्या या मूक मोर्चामध्ये शेकडो तरूण सहभागी झाले होते. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला एक महिन्याहून अधिक कालावधी उलटून गेला आहे. ही एका व्यक्तीची हत्या नसून ती समाजाच्या विज्ञाननिष्ठ आणि तर्कनिष्ठ विचार करण्याच्या प्रक्रियेला थांबविण्याकरिता करण्यात आलेली सामाजिक विचार हत्या आहे. अशा प्रकारे महात्मा गांधी, मार्टीन ल्युथर किंग, सफदर हाश्मी यांच्याही हत्या समाजप्रबोधनाचे कार्य थांबविण्याच्या उद्देशानेच करण्यात आल्या होत्या. मात्र, सरकार याची योग्य ती दखल घेताना दिसत नाही. सरकारवर कुणाचाही दबाव नसल्यासारखे ते वागत आहेत परंतू सरकारला आपली जबाबदारी झटकता येणार नाही आणि लवकरात लवकर मारेकऱ्यांचा शोध लावावाच लागेल, असे महाराष्ट्र समितीचे प्रतिनिधी गिरीश ढोके यांनी सांगितले.
महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने सर्वसामान्य माणसाला सक्षम आणि निर्भय बनविण्याच्या उद्देशाने ‘महाराष्ट्र समिती’ या सामाजिक संघटनेची स्थापना करून मोर्चाच्या माध्यमातून कामाला सुरुवात करण्यात आली. समाजसुधारणा, लोकशिक्षण, जनजागृती आणि संघर्ष करण्याच्या उद्देशाने संस्थेतर्फे वेगवेगळे कार्यक्रम पुढील काळात राबविण्यात येणार आहेत.
मोच्र्य़ाच्या सुरूवातीला तरूणांतर्फे सामाजिक आशय असलेली गाणी सादर करण्यात आली आणि समारोपाला पथनाट्य सादर करून समाज विघातक शक्तींच्या विरोधात लढण्याचा निर्धार करण्यात आला. मोच्र्याच्या अखेरीस तरुणांनी हात उंचावून डॉ. दाभोलकर यांच्या निघृण हत्येचा निषेध करत त्यांच्या हत्येमागे असलेल्या प्रवृत्तीला आव्हान देत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करत राहण्याचा निर्धार केला.