दिल्ली येथील सामूहिक बलात्कारप्रकरण तसेच राज्यासह ठाणे जिल्ह्य़ातील आश्रम शाळांमधील मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी श्रमजीवी संघटनेशी संलग्न महिला ठिणगीने गुरुवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चेकरांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवत विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या मोच्र्यात युवक आणि युवतींनी जनजागृतीपर पथनाटय़ही सादर केले. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त या मोच्र्याचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे येथील शिवाजी मैदान येथून निघालेल्या मोच्र्यामध्ये आदिवासी महिला मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या. स्वतंत्र लोकशाही देशात महिला व अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेला प्राधान्य द्या, अशी मागणी मोर्चेकरांकडून यावेळी करण्यात आली. तसेच महिलांच्या सुरक्षिततेविषयी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. दरम्यान, या मोर्चामुळे या भागातील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली.