छळ करून मुलाच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याबद्धल अन्य मुलांवर रॅगिंगविरोधी कायद्याचे कलम लावावे या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. संगमनेर अमृतवाहिनी पॉलिटेक्निक महाविद्यालयातील ही घटना आहे.
भाऊसाहेब बाबूराव खंडागळे (वय, ४४ धंदा शेती, रा. वांजोळी, ता, नेवासे) यांनी यासंदर्भात पोलिसांकडे फिर्याद दिली आहे, मात्र पोलिसांनी मुलाच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या मुलांना रॅगिंग विरोधी कायद्याचे कलम लावलेले नाही, ते लावावे अन्यथा नगर-औरंगाबाद रस्त्यावर पांढरीचा पूल येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला. बद्रीनाथ खंडागळे, नामदेव कोरडे, रंजना दागंट, छाया सुक्रे, अप्पा खंडागळे,नवनाथ पागिरे, सुनिता खंडागळे आदींसह मोर्चात मोठय़ा संख्यने महिलांचा सहभाग होता.
खंडागळे यांचा मुलगा प्रदिप हा अमृतवाहिनी मध्ये सिव्हील इंजिनिअरींगच्या पहिल्या वर्षांत शिकत होता. महाविद्यालयात पहिल्या दिवसापासून त्याला वरच्या वर्गातील मुलांकडून सतत त्रास दिला जात होता. दर महिन्याला तो घरातून ४ ते ५ हजार रूपये नेत असे. एवढे पैसे कशासाठी विचारल्यावर त्याने वरच्या वर्गातील मुलांना द्यावे लागतात असे सांगितले. त्याचे साहित्य चोरणे, सतत पैसे मागणे, चहा जेवणासाठी त्याला त्रास देणे असे प्रकार मुलांकडून सतत होत असे. उसने दिलेले पैसे मागितल्यावरून त्याला मारहाणही करण्यात आली. या सततच्या मानसिक व शारीरिक छळामुळेच तो मरण पावला असे खंडागळे यांचे म्हणणे आहे. पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत त्यांनी छळ करणाऱ्या मुलांची नावेही दिली. मात्र पोलिसांनी त्यांच्यावर कसलाही गुन्हा दाखल केला नाही.