पाणीप्रश्नासह विविध मागण्यांसाठी इचलकरंजी शहर भाजपाच्यावतीने नगरपालिकेवर भर उन्हात मोर्चा काढण्यात आला. पोलिसांचे कडे भेदून आंदोलकांनी पालिकेत प्रवेश करून मातीचे मडके फोडून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शंखध्वनी केला. नगराध्यक्षा सुप्रिया गोंदकर यांना विविध प्रश्नांवरून धारेवर धरल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. इचलकरंजी शहरात अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत आहे. नागरी समस्या गंभीर बनल्या आहेत, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपाच्यावतीने नगरपालिकेवर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चा पालिकेवर पोहोचल्यावर आक्रमक आंदोलकांनी पोलिसांचे कडे तोडून पालिकेत प्रवेश केला. तेथे मडकी फोडण्यात आली. सत्ताधाऱ्यांच्या नांवाने शंखध्वनी करण्यात आला. पोलीस व आंदोलकांच्यात झटापट झाली.
मोर्चाच्या शिष्टमंडळाने जलपर्णी असलेली मडकी नगराध्यक्षांच्या टेबलावर ठेवून निषेध नोंदविला. पुंडलिक जाधव, धोंडीराम जावळे, किरण दंडगे, सुरेश माने, राहुल निमणकर यांनी नगराध्यक्षांना धारेवर धरले.चोवीस तास पाणीपुरवठय़ाची हमी देणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला.अभियंता सुभाष देशपांडे यांनी दोन दिवसातून एकदा पाणी देण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळाने मात्र दररोज पाणीपुरवठा करण्याची मागणी कायम ठेवली. नगराध्यक्षा गोंदकर व उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. चर्चेत नगरसेवक अशोक जांभळे, शशांक बावसकर,भाऊसाहेब आवळे, मुख्याधिकारी नितीन देसाई आदींनी भाग घेतला.
इचलकरंजीत भाजपचा विविध मागण्यांसाठी मोर्चा
पाणीप्रश्नासह विविध मागण्यांसाठी इचलकरंजी शहर भाजपाच्यावतीने नगरपालिकेवर भर उन्हात मोर्चा काढण्यात आला. पोलिसांचे कडे भेदून आंदोलकांनी पालिकेत प्रवेश करून मातीचे मडके फोडून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शंखध्वनी केला. नगराध्यक्षा सुप्रिया गोंदकर यांना विविध प्रश्नांवरून धारेवर धरल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
First published on: 10-04-2013 at 01:02 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Morcha for various demands by bjp in ichalkaranji