राज्य शासनाच्या एका आदेशान्वये अन्न व औषध प्रशासनाने सुगंधित तंबाखू, गोड सुपारी, मावा व खऱ्र्यावर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे पानटपरीवाल्यांवर बेरोजगारी व उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील त्यांनी संघटनेची स्थापना करून शासन निर्णयाविरोधात आंदोलन सुरू केले आहे. शासनाच्या या निर्णयाचा निषेध करून जिल्ह्य़ातील हजारो पानटपरीवाल्यांनी संघटनेच्या माध्यमातून अलीकडेच जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.
राज्य शासनाने गुटखा बंदीनंतर मावा, खर्रा, सुगंधित तंबाखू व स्वीट सुपारीच्या विक्रीवरही बंदी घातली आहे. आधीच बुलढाणा जिल्हा मागासलेला आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ व बेरोजगारी यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहेत. अनेक बेरोजगार युवकांनी कर्ज काढून किंवा उधार उसनवारी करून पानटपऱ्या थाटल्या आहेत. मात्र, या शासन निर्णयामुळे जिल्ह्य़ातील सुमारे २० हजार पानटपरीवाल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या निर्णयाच्या विरोधात जिल्ह्य़ातील हजारो पानटपरीवाले व पानसाहित्य विक्रेत्यांनी संघटनेच्या माध्यमातून आंदोलनाचा भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला. स्थानिक गांधी भवनातून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. हाती शासनाचा निषेध करणारे फलक घेऊन निघालेला हा मोर्चा पोलीस ठाण्यासमोरून बाजार लाईन, कारंजा चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मनसेचे प्रा.प्रदीप पाटील व देवेंद्र खोत, धर्मवीर संघटनेचे महेंद्र सूर्यवंशी, मो.निसार, मनोज देशमुख, सुरेंद्र दसरकर यांच्यासह जिल्हा पानपट्टी व पानमटेरियल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय मागे घेण्याच्या मागण्याची निवेदन सादर केले. या मोर्चात जिल्ह्य़ातील हजारो पानपट्टी, पानमटेरियलधारक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Morcha in buldhana distrect