महाराष्ट्र दहशतवादीविरोधी पथकाच्या (एटीएस) कार्यपद्धतीत सुधारणा करून मिर्झा रिझवान बेग याच्या मृत्यूबद्दल दोषी अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी बुधवारी महाराष्ट्र समता कामगार संघटना व शिवराज्य पक्ष या संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या वेळी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.
महाराष्ट्र एटीएसच्या त्रासाला कंटाळून औरंगाबाद येथील मिर्झा रिझवान बेग याने आत्महत्या केल्याचा आरोप या संघटनांनी केला. मुस्लिम तरुणांना खोटय़ा प्रकरणात गोवून मानसिक त्रास देण्यात येत आहे. पुणे येथील बॉम्बस्फोट प्रकरणातही तीन तरुणांवर अशाच प्रकारे आरोप लावत गुन्हा कबूल करण्यासाठी त्यांच्यावर अमानुष अत्याचार केल्याची टीका शिवराज्य पक्ष व महाराष्ट्र समता कामगार संघटनेने केली. या प्रकारामुळे मुस्लिम समाजात असुरक्षिततेची भावना वाढली असून, महाराष्ट्र एटीएसच्या कार्यपद्धतीत बदल करावा, अत्याचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी या संघटनांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. मोर्चादरम्यान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तोंडाला काळ्या पट्टय़ा लावल्या होत्या. मोर्चा शांततेत पार पाडावा म्हणून पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली. मोर्चाच्या बंदोबस्तासाठी मोठय़ा संख्येने हत्यारी पोलीस तैनात होते. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर शिवराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष रामदास अवचार, कार्याध्यक्ष अब्दुल मोईज अन्सारी, समता कामगार संघटनेचे संदीप चव्हाण, देविदास जाधव आदींच्या सह्य़ा आहेत.

Story img Loader