मध्य प्रदेश शासनाने कांची सुमेरू पीठाचे स्वामी नरेंद्रानंद सरस्वती यांना ताब्यात घेऊन अपमानास्पद वागणूक दिल्याच्या निषेधार्थ येथील हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने शिवाजी चौकात निदर्शने करण्यात आली. सत्ता मिळविण्यासाठी केवळ हिंदुत्वाचा वापर करणाऱ्या राज्यातील भाजप सरकारचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविण्यात आला.
    मध्य प्रदेशातील धार येथील सरस्वती मंदिरात पूजा करण्यासाठी गेलेल्या स्वामी नरेंद्रानंद सरस्वती यांना पोलिसांनी सुरक्षेच्या कारणावरून गाडीत घेऊन फिरविले. त्यांच्याशी कोणाचाही संपर्क होऊ दिला नाही.
मध्य प्रदेश शासनाच्या हिंदू संतांबद्दल वागण्याच्या या अन्यायी प्रकाराचा निषेध कार्यकर्त्यांनी केला. या प्रकाराबद्दल भाजप राज्य शासनाने माफी मागावी, भोजशाळा मुक्तियज्ञ संयोजक नवलकिशोर शर्मा यांची सुटका करावी, भोज शाळेत हिंदूंना कायमस्वरूपी पूजा करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
    आंदोलनात सनातन संस्थेचे मधुकर नाजरे, हिंदू एकता आंदोलनाचे दिलीप भिवटे, बजरंग दलाचे संभाजी साळुंखे, हिंदुराव शेळके, महेश उरसाल, शशी बिडकर, दादा महाराज, संगीत कडूकर, ऋचा भिसे, डॉ. मानसिंग शिंदे, कमलाकर शिंदे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.