कोल्हापूर जिल्ह्य़ातील ४५ हजार शेतकऱ्यांच्या ११२ कोटी रूपयाच्या कर्जास अपात्र ठरविणाऱ्या तत्कालीन संचालक मंडळावर दावे दाखल करावेत, या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने गुरूवारी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर धडक मोर्चा काढण्यात आला. जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चावेळी ३०० वर शिवसैनिकांनी जिल्हा बँक परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. बँकेचे प्रशासक प्रतापराव चव्हाण यांनी निवेदन स्वीकारून चौकशीचे आश्वासन दिले.पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये कोल्हापूर जिल्ह्य़ामध्ये बोगस कर्जमाफीचा प्रकार घडला आहे. जिल्ह्य़ात २ लाख १० हजार शेतकऱ्यांना २९१ कोटी रूपयांची कर्जमाफी झाली होती. त्यातील ४५हजार शेतकऱ्यांचे ११२ कोटी रूपयांचे कर्ज अपात्र ठरले आहे. अपात्र ठरलेल्या कर्जाची वसुली सुरू असून कॅगच्या अहवालानुसार कर्जमाफीत घोटाळा झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्य़ात खळबळ उडाली आहे.
अपात्र ठरलेल्या कर्जाची फेरतपासणी केली जाणार आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना पुन्हा कर्जाची रक्कम भरावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पाश्र्वभूमीवर शिवसेनेने शेतकऱ्यांची बाजू उचलून धरून अपात्र कर्जमाफी प्रकरणी आंदोलन करण्याचे ठरविले आहे. त्याचा भाग म्हणून सेनेच्यावतीने गुरूवारी निर्धार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. बीटी कॉलेज येथून मोर्चाला सुरूवात झाली. भगवे ध्वज घेतलेल्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी करीत जिल्हा बँकेत प्रवेश केला. बँकेच्या आवारात बोगस कर्जमाफीची चौकशी झाली पाहिजे, शेतकऱ्यांचे पैसे खाणाऱ्या संचालकांचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी करण्यात आली.
शिवसेनेच्या शिष्टमंडळाने बँकेचे प्रशासक प्रतापराव चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.कर्जमाफी झाली तेंव्हा अध्यक्ष पी.जी.शिंदे व संचालक कार्यरत होते. ११२ कोटी रूपयांच्या अपात्र कर्जमाफीसहे संचालक मंडळ जबाबदार आहे, असा आरोप करून संचालकांच्या कारभाराची नव्याने चौकशी करावी,अशी मागणी पवार व देवणे यांनी केली. चर्चेत शिवाजी पाटील, विजय कुलकर्णी, सुजित चव्हाण, हर्षल सुर्वे,शिवाजी जाधव, रवी चौगुले, महिला आघाडी संघटक शुभांगी साळोखे, सुजाता सुहाणे, ममता मचले, गणेश देवणे, किरण पडवळे आदींनी भाग घेतला.
४५ हजार शेतकऱ्यांना ठरवले अपात्र; बँकेवर शिवसेनेचा धडक मोर्चा
कोल्हापूर जिल्ह्य़ातील ४५ हजार शेतकऱ्यांच्या ११२ कोटी रूपयाच्या कर्जास अपात्र ठरविणाऱ्या तत्कालीन संचालक मंडळावर दावे दाखल करावेत, या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने गुरूवारी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर धडक मोर्चा काढण्यात आला. जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चावेळी ३०० वर शिवसैनिकांनी जिल्हा बँक परिसरात जोरदार घोषणाबाजी केली
First published on: 22-03-2013 at 01:14 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Morcha on jilha madhyavarti bank by shiv sena