टोल आकारणीबाबत नगरसेवकांची भूमिका स्पष्ट व्हावी, यासाठी मंगळवारी महापालिकेच्या सभेवेळी महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर कामगारमंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या घरावरही टप्प्याटप्प्याने मोर्चे काढले जाणार आहेत. तर ८ जुलैला टोल विरोधात महामोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. हा निर्णय सोमवारी सायंकाळी झालेल्या टोलविरोधी कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
शहरातील रस्त्यांवर टोल आकारणी करण्याबाबत राज्य शासन आग्रही आहे. तर दुसरीकडे शहरातील नागरिकांचा टोल आकारणीस विरोध आहे. नुकत्याच मुंबईत झालेल्या बैठकीत टोल आकारणीबाबत निश्चित निर्णय झाला नाही. त्यामुळे टोलविरोधी कृती समितीने आपले आंदोलन आक्रमक रीत्या पुढे रेटण्याचे ठरविले आहे. त्याचे नियोजन करण्यासाठी सोमवारी कृती समितीची बैठक राजर्षी शाहू स्मारक भवन येथे झाली.
आजच्या बैठकीत ज्येष्ठ नेते एन.डी.पाटील, निमंत्रक निवास साळोखे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार डॉ.सुजित मिणचेकर, आमदार सुरेश हाळवणकर, रामभाऊ चव्हाण, महीपतराव बोंद्रे, अॅड.शिवाजी राणे आदींनी मार्गदर्शन केले.
या वेळी आंदोलनाची दिशा कोणत्या प्रकारची असावी याविषयी कृती समितीच्या कार्यकर्त्यांची मते आजमाविण्यात आली. आंदोलनाची सुरुवात महापालिकेपासून करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्यासाठी उद्या मंगळवारी महापालिकेची सभा सुरू असताना मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. टोल आकारणीबाबत भूमिका स्पष्ट करण्याविषयीचा जाब नगरसेवकांना सभेवेळी विचारला जाणार आहे. तसेच महापालिकेला एक नोटीस दिली जाणार आहे. त्यामध्ये टोल आकारणी रद्द झाली नाही, तर घरफाळा व पाणीपट्टी भरली जाणार नाही, असा इशारा दिला जाणार आहे. शहरातील रस्ते बनविण्याची जबाबदारी महापालिकेची असताना आयआरबीसारख्या खाजगी कंपनीचे भले होण्यासाठी खाजगीकरणातून रस्ता कशासाठी बनविण्यात आला, असा प्रश्नही त्यामध्ये विचारला जाणार आहे.
जिल्ह्य़ातील दोन्ही मंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. १६ जून रोजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या कसबा बावडा येथील निवासस्थानावर मोर्चा काढण्यात येणार आहे. तर २२ जून रोजी कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानावर मोर्चा काढला जाणार आहे. यापूर्वी महामोर्चा काढून टोलविरोधातील शहरवासीयांच्या एकजुटीचे प्रदर्शन घडविले होते. आता ८ जुलैला पुन्हा एकदा महामोर्चा काढून टोल विरोधातील एकतेची वज्रमूठ उगारण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jun 2013 रोजी प्रकाशित
टोलविरोधात आज महापालिकेवर मोर्चा
टोल आकारणीबाबत नगरसेवकांची भूमिका स्पष्ट व्हावी, यासाठी मंगळवारी महापालिकेच्या सभेवेळी महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे.
First published on: 11-06-2013 at 01:59 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Morcha on mnc against toll