देवदेवतांच्या यात्रेमधील बैलगाडा शर्यतींची बंदी उठवावी या मागणीसाठी जुन्नर तहसील कार्यालयावर जुन्नर तालुका बैलगाडा चालक संघटनेच्या वतीने बुधवारी मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे आता या शर्यतींचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष किशोर दांगट यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर तालुक्यातील शेकडो बैलगाडा चालकांनी बैलगाडांसह मोर्चा काढला. तत्पूर्वी आमदार वल्लभशेठ बेनके यांना निवेदन देऊन पंजाब व हरियाना राज्यांनी बैलगाडा शर्यतींसाठी जो कायदा केला आहे, त्याचा अभ्यास करून राज्य शासनाने तशाच प्रकारचा कायदा करावा व सर्व पक्षांनी एकमुखी पाठिंबा देऊन बैलगाडा शर्यती सुरू कराव्यात, अशा आशयाचे निवेदन दिले.
तहसीलदार दिगंबर रौंधळ, जुन्नरचे पोलीस निरीक्षक राजाराम परदेशी यांना दिलेल्या निवेदनात बैलगाडा संघटनेने म्हटले आहे, की तालुक्यात ज्या ठिकाणी नवसाच्या देवदेवतांच्या यात्रा होतात, त्या यात्रांमध्ये शेकडो वर्षांपासून बैलगाडा मालकांचे बैलगाडे धावतात, शेतकरी बैलांवर मुलांपेक्षा जास्त प्रेम करतात. वासरू जन्माला आल्यापासून शेवटपर्यंत त्याचा कुटुंबातील घटक या नात्याने सांभाळ करतात. त्यांना इजा होईल असे कुठलेही कृत्य करीत नाहीत. कथित लोकांनी जाणून-बुजून आम्ही जनावरांचा छळ करतो असा आरोप सातत्याने केला जातो, शेतक ऱ्यांच्या जीवनामध्ये यात्रेच्या निमित्ताने होणाऱ्या बैलगाडा शर्यतीमुळे आनंद मिळतो, या आनंदाला कोणीही वंचित करू नये. शर्यतीबाबत शासनाने सहानुभूतीपूर्वक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
या मोर्चात विलास भुजबळ, बबन दांगट, रमेश डोंगरे, जाणकु डावखर, दत्तोबा ढोले, शिवाजी वर्पे, प्रकाश कबाडी, बाळासाहेब चव्हाण, राकेश खैरे, पपु कोकणे, वैयष्णव नारूडकर, शिवदत्त संते, निवृत्ती शेटे, साहेबराव गाढवे, नितीन थिगळे, सोपान पोखरकर, उत्तम गावडे यांच्यासह शेकडो बैलगाडा मालक सहभागी झाले होते. या मोर्चाला अण्णा भेगडे, धोंडीभाऊ पिंगट, साहेबराव आढळराव पाटील यांनी मार्गदर्शन केले.    

Story img Loader