पुणे विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल पंचेचाळीस दिवसांत जाहीर करावेत, पुनर्मूल्यांकनाचा निकाल मर्यादित कालावधीत लावण्यात यावा अशा विविध प्रलंबित मागण्यांसाठी विद्यापीठाचे अधिसभा सदस्य, विद्यार्थी संघटना एकत्र येऊन कुलगुरू कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत, अशी माहिती अधिसभा सदस्यांनी बुधवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
यावेळी अधिसभेचे सदस्य संतोष ढोरे, शशिकांत तिकोटे, दादाभाऊ शिनलकर, राजेंद्र काळे, माजी प्रतिनिधी धनंजय कुलकर्णी, विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी अरविंद गोरे, सुरेश जैन, बापू पवार उपस्थित होते. पुणे विद्यापीठाच्या सर्व परीक्षांचे निकाल ४५ दिवसांत लावण्यात यावेत. यावर्षी निकाल जाहीर होण्यास उशीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून या दिरंगाईला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. पुनर्मूल्यांकनाचा निकाल मर्यादित कालावधीमध्ये जाहीर करण्यात यावा. बहि:स्थ अभ्यासक्रम बंद करण्यात येऊ नयेत, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या तीन वर्षांपासून रखडलेल्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात यावे. कमवा व शिका योजनेतील विद्यार्थ्यांना प्रतितास ४० रुपये मानधन देण्यात यावे. विद्यार्थी वसतिगृहामध्ये सध्या फक्त दोनच कर्मचारी असून कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांवर नेमणूक करावी. बॅरिस्टर जयकर ग्रंथालयातील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेश व चांगल्या खुच्र्या असाव्यात. कुलगुरूंनी अधिसभा सदस्यांसाठी आणि विद्यार्थी संघटनांसाठी वेळ राखून ठेवावी, अशा विविध मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या दिरंगाईचा विद्यार्थ्यांना फटका
विद्यापीठाच्या दिरंगाईमुळे विद्यापीठातील अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही. विद्यापीठाने समाजकल्याण विभागाकडे विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत प्रस्ताव वेळेवर न पाठवल्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागले आहे. तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही.

Story img Loader