केंद्र व राज्य सरकारचे महागाईवरील नियंत्रण सुटले आहे. सर्वसामान्य नागरिकांत विशेषत: महिलांमध्ये त्याबद्धल रोष आहे, भारतीय जनता पक्षाच्या विधानसभेच्या नागपूर अधिवेशनावरील मोर्चातून तो व्यक्त होईल असा विश्वास पक्षाच्या महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री माधवी नाईक यांनी व्यक्त केला. पक्षाच्या या मोर्चात महिला आघाडीचा मोठा सहभाग असणार आहे.
या मोर्चाच्या तसेच मोर्चापुवी चौंडी (ता. जामखेड) येथे होणाऱ्या महिला मेळाव्याच्या नियोजनासाठी श्रीमती नाईक नगरला आल्या होत्या. उपमहापौर गीतांजली काळे यांनी त्यांचे स्वागत केले व मोर्चासाठी नगरमधून मोठय़ा प्रमाणावर महिला येतील असे सांगितले. महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या उपसभापती मालनताई ढोणे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सुरेखा विद्ये तसेच नगरसेविका संगीता खरमाळे, निलिमा गायकवाड व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या.
पत्रकारांशी संवाद साधताना श्रीमती नाईक यांनी महागाईने सर्वसामान्यांचे जगणे अवघड केले असल्याची व त्याला सरकारच जबाबदार असल्याची टिका केली. त्यामुळेच भाजपच्या वतीने विधानसभेच्या नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढून विधानसभेला घेराव घालण्यात येणार आहे. यात महिला मोर्चा आघाडीवर असणार आहे. त्यासाठी चलो नागपूर अशी मोहिम राबवण्यात येत असून त्यात चौकसभा, मेळावे यातून जनजागृती करण्यात येणार आहे असे श्रीमती नाईक यांनी सांगितले.
नगर जिल्ह्य़ातही १ ते ८ डिसेंबर दरम्यान सर्व तालुक्यात, गावांमध्ये चौकसभा होतील. यात ६ डिसेंबरला चौंडी पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर यांच्या जन्मगावी जिल्ह्य़ातील महिलांचा मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्याला महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा निता केळकर तसेच अन्य राज्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहे अशी माहिती श्रीमती नाईक यांनी दिली.