कमी दरात सोने देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पकडून बेदम मारहाण करून त्यांना जुना राजवाडा पोलिसांच्या हवाली केले होते. परंतु या गुन्हेगारांवर व यामध्ये गुंतलेल्या एका पोलिसावर कारवाई न करता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर मारहाणीचे गुन्हे दाखल केले होते. या प्रकाराविरूध्द बुधवारी शिवसेनेने आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली जुना राजवाडा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला होता.     
पोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेने बुधवारी मोर्चा काढला. मोर्चाची सुरूवात शिवाजी चौकातून झाली. मोर्चा जुना राजवाडा पोलीस ठाण्यावर पोहोचल्यावर ‘गुंतलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन करा’, ‘गुन्हेगारांवर कडक कारवाई झालीच पाहिजे’ आदी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.     
पोलीस ठाण्यामध्ये पोलीस उपअधीक्षक महेश सावंत यांना निवेदन देण्यात आले. या वेळी बोलतांना आमदार क्षीरसागर म्हणाले, या प्रकरणामध्ये पकडलेल्या दोंन्ही गुन्हेगारांनी त्यांनी केलेल्या अनेक गुन्ह्य़ांची कबुली देत पोलीस प्रशासनातील काही कर्मचारी त्यांना यामध्ये पाठबळ देत आहेत. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचे नांव या गुन्हेगारांनी घेतले होते. परंतु पोलीस प्रशासन या दोन गुन्हेगारांवर व एका पोलीस कॉन्स्टेबलवर कारवाई करण्याचे सोडून त्यांना पकडून देणाऱ्या शिवसैनिकांवर कारवाई करण्याचे कटकारस्थान आखत आहे, असा आरोप त्यांनी केला. या प्रकरणामध्ये सहभागी असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल व आरोपींवर ८ मार्चपर्यंत कारवाई झाली, तर ९ मार्च रोजी जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.    
पोलीस उपअधीक्षक सावंत म्हणाले,की आरोपींनी ज्या पोलिसांची नांवे घेतली आहेत, त्यांचीही चौकशी करून त्यांच्या निलंबनाच्या कारवाईच्यादृष्टीने पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.    या मोर्चामध्ये शिवसेना उपशहरप्रमुख जयवंत हारूगले, रमेश खाडे, दुर्गेश लिंग्रज, तुकाराम साळोखे,रणजित जाधव, दीपक चव्हाण, विश्वजित मोहिते, सुजित देशपांडे, राजू पाटील, अरविंद मेढे, गजानन भुर्के आदींसह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Story img Loader