फटाके म्हणजे दिवाळीचे खास आकर्षण. ‘दिन दिन दिवाळी’ असे म्हणत सुरसुरी फिरविणाऱ्या बच्चे कंपनींमध्ये सध्या ‘फॅन्सी आयटम’ची जबरदस्त क्रेझ आहे. त्यांची आवड लक्षात घेऊन यंदा फटाक्यांमध्ये विविध फॅन्सी प्रकार दाखल झाले आहेत. फटाक्यांच्या किंमतीत २० टक्क्यांनी भाववाढ झाली असली तरी ग्राहकांच्या उत्साहावर त्यामुळे कोणताच फरक पडला नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
ग्राहकांचा चायना प्रकारापेक्षा भारतीय फटाक्यांवरच अधिक विश्वास असल्याचे जाणवते. कमी आवाजाच्या आणि नेत्रदीपक रोषणाई करणाऱ्या फॅन्सी प्रकाराला ग्राहकांकडून विशेष पसंती मिळत असल्याचे करंजकर फटाकाचे संचालक अमोल करंजकर यांनी सांगितले. मजुरांची कमतरता तसेच परवाना मिळविण्यात येणाऱ्या अडचणी, यांमुळेही भाववाढ झाली असल्याचे  करंजकर यांनी सांगितले. दर वाढलेले असले तरी ग्राहकांचा उत्साह अजिबात कमी झालेला नाही. टिकली, सुरसुरी, लवंगी, चौरसी (फटाका), तोटे (पाऊस), लेस, पेन्सील, नागगोळी, भूईचक्र, असे विविध प्रकार बाजारात आहेत. यामध्येही जायन्ट, ट्राय कलर, लहान, मोठे, साधे असेही प्रकार पहावयास मिळतात. साधारणत प्रती बॉक्स ७० ते ८० पासून थेट ३०० रुपयांपर्यंत विक्री होत आहे. याशिवाय फटाक्यांच्या एक हजार, दोन हजार, पाच हजार, दहा हजार याच्या माळाही ४०० रुपयांपासून पुढे विक्रीस उपलब्ध आहेत. फॅन्सी प्रकारात सिग्नल लाईट, कलर चेंज बटर फ्लाय, व्हिज व्हिल, टेन शॉट,  एरियल आऊट, सेव्हन शॉट, स्टार फायर, गोल्डन ड्राप्स, जस्मीन ड्राप्स असे विविध प्रकार पहावयास मिळतात. फॅन्सी प्रकारांची किंमत पारंपरिक प्रकारांच्या तुलनेत काही अंशी जास्त असली तरी त्याचा विक्रीवर कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही. विविध बनावटीच्या बंदुकाही बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. एकाचवेळी हजारो टिकल्यांचा आवाज करणाऱ्या कारगील बुलेटसह रंगीबेरंगी स्नेक, कलर थंडर, रांगोळी, गोल्डन विस्ल खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे. फटाक्यांचे वैविद्य पाहता कुठला प्रकार घेऊ, या विवंचनेत असणाऱ्या ग्राहकांसाठी ६५० पासून एक हजार रुपयांपर्यंत खास गिफ्ट बॉक्स उपलब्ध करून देण्यात आले आहे.   

Story img Loader