दहा शिक्षकांना जामीन नाकारला
प्रशासकीय बदल्या टाळण्यासाठी जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांना अपंगत्वाची बनावट प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देणाऱ्या संजय चंद्रकांत सावळे (पिंपरकणे रस्ता, राजूर, अकोले) याला न्यायालयाने उद्यापर्यंत (शुक्रवार) पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश आज दिला. दरम्यान, पोलीस कोठडीतून आज न्यायालयीन कोठडीत रवानगी झालेल्या १० प्राथमिक शिक्षकांना जामीन नाकारण्यात आला. पोलीस चौकशीत अपंगत्वाचे बनावट दाखले मिळवून देणाऱ्यांची आणखी ५ नावे निष्पन्न झाली, त्यात दोघे प्राध्यापक असल्याचे समजले.
प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी इंदलकर यांनी हा आदेश दिला. जि. प.ने बनावट दाखले सादर करणाऱ्या ७८ शिक्षकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील २५ शिक्षकांना उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयापुढे हजर होण्याचा आदेश दिला. त्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती. हजर झालेल्या सुवर्णा अकोलकर, संगीता जाधव, रेश्मा सोनवणे, भिमाजी लोंढे, योजना काकड, ललीता जाधव, नाथू मुठे, विद्या राऊत, बबन देवडे व महादेव देवडे या १० शिक्षकांना सोमवारी कोतवाली पोलिसांनी अटक केली होती. त्यांना आजपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश होता. या दहाही जणांची आज न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. त्यांनी जामिनासाठी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला. शिक्षक समाजातील जबाबदार व्यक्ती आहेत, ते गुन्ह्य़ातील पुरावा नष्ट करण्यासाठी हस्तक्षेप करु शकतात, असा युक्तिवाद सरकारी वकील संगीता ढगे यांनी केला. शिक्षकांच्या वतीने वकील विवेक म्हसे यांनी काम
पाहिले.
या दहा शिक्षकांपैकी काहीजणांना संजय सावळे याच्याकडून बनावट दाखले मिळाल्याचे पोलिसांना निष्पन्न झाले होते, त्यानुसार सावळे याला काल अटक करुन आज कोतवाली पोलिसांनी न्यायालयापुढे हजर केले. त्याला उद्यापर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला. सरकारी वकील ढगे व आरोपीचे वकील संजय दुशिंग यांनी काम पाहिले. पोलीस तपासात बनावट दाखले देणाऱ्यांचे मोठे रॅकेट असल्याचे निष्पन्न झाले. सावळे हा स्वत: अपंग आहे, त्याने अपंगांची अनेक शिबिरे घेतली, त्यातून बनावट दाखले वितरीत झाल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आणखी ५ नावे निष्पन्न झाली, ते श्रीरामपूर, शेवगाव, पारनेरमधील आहेत. त्यातील दोघे प्राध्यापक आहेत.

Story img Loader