दिवाळीची सुटी सुरू झाल्याने परगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली असून त्यामुळे रेल्वे व एसटी बसेस तुडूंब भरून धावत आहेत. त्यामुळे रेल्वेसेवेवर जादा ताण पडला आहे. मात्र त्यामुळे प्रवाशांनाच त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत: आरक्षित प्रवासाच्या डब्यांमध्ये अन्य प्रवाशांची घुसखोरी वाढल्यामुळे आरक्षित डब्यांना अर्थच उरला नसल्याचे दिसून येते.
गेल्या काही दिवसांपासून दिवाळी सुटीला प्रारंभ झाल्यावर परगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी प्रमाणापेक्षा जास्त वाढली आहे. सोलापूर रेल्वे स्थानकावर रेल्वेगाडीमध्ये जागा पकडण्यासाठी प्रवाशांची तारांबळ होत आहे. सोलापूर-मुंबई सिध्देश्वर एक्स्प्रेससह हैदराबाद-मुंबई हुसेनसागर एक्स्प्रेस, चेन्नई मेल, सोलापूर-पुणे इंटरसिटी आदी सर्व गाडय़ांमध्ये प्रवाशांचे लोंढे वाढल्याने त्याचा जादा ताण रेल्वे प्रशासनावर पडला आहे. आरक्षण करून प्रवास करणे सुरक्षित असल्याची समजूत खोटी ठरत आहे. कारण आरक्षित डब्यांमध्ये अनारक्षित प्रवाशांनी गर्दी केल्यामुळे मूळ आरक्षित प्रवाशांना अक्षरश: कुंचबणा सहन करावी लागत आहे. महिला व लहान मुले तसेच वयोवृध्द मंडळींना रीतसर आरक्षण करूनदेखील प्रवास करणे जोखमीचे वाटू लागले आहे. डब्यात पाय ठेवायलाही जागा नसल्यामुळे सर्वाचे हाल होत आहेत. दरम्यान, प्रवाशांची वाढती गर्दी विचारात घेऊन मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने कालपासून सोलापूर-पुणे-सोलापूर सुपरफास्ट एक्स्प्रेस (०१०१३/०१०१४) विशेष स्वरूपात सुरू केली आहे. ही गाडी येत्या १८ नोव्हेंबपर्यंत दररोज धावणार आहे. ही गाडी सोलापूरहून सकाळी ११ वा सुटेल व पुण्यात दुपारी ३.१० वाजता पोहोचेल. नंतर ही गाडी दुपारी ४.१५ वाजता पुण्यातून सुटून सोलापुरात रात्री ८.५५ वा पोहोचेल. या विशेष गाडीलाही प्रवाशांची गर्दी वाढल्याचे दिसून आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा