बदलापूर पूर्व आणि पश्चिम विभागात एमएमआरडीएने उभारलेल्या स्कायवॉकना रेल्वे मार्गात जोडणाऱ्या पुलाचा आराखडा सदोष असल्याचे निष्पन्न झाल्याने आणखी किमान सहा महिने बदलापूरकरांना धोकादायक पद्धतीनेच रेल्वे मार्ग ओलांडून प्रवास करावा लागणार हे स्पष्ट झाले आहे.
तीन वर्षांपूर्वीच बदलापूर शहराच्या दोन्ही भागांमध्ये उभारण्यात आलेले स्कायवॉक रेल्वे मार्गात न जोडले गेल्याने केवळ शोभेचे टेहळणी बुरूज ठरले आहेत. रेल्वे मार्गातील स्कायवॉक जोडणीसाठी अडीच वर्षांपूर्वीच एमएमआरडीएने रेल्वे प्रशासनाकडे ३ कोटी ७३ लाख रुपये भरले आहेत. तरीही या पुलाचा आराखडा तयार करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने बराच वेळ घेतला. स्थानिकांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर जाग आलेल्या रेल्वे प्रशासनाने कामास सुरुवात केली. मात्र एक आणि दोन नंबर फलाटावरील खांब चुकीच्या ठिकाणी उभारण्यात आला. ती चूक लक्षात आल्यानंतर खांबाची जागा बदलण्यात आली. अखेर आता खांब उभे राहून साहित्यही आल्यावर हा पूल ओव्हरहेड वायरला लागेल, असा साक्षात्कार रेल्वेच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना झाला. त्यामुळे आता पुन्हा नव्याने पुलाचा आराखडा तयार करावा लागणार आहे. आता पुलाची उंची वाढविणे अथवा ओव्हरहेड वायर थोडी खाली घेणे हे दोनच पर्याय आहेत. ओव्हरहेड वायर खाली घेण्यासाठी ५० लाख रुपयांची आवश्यकता असून रेल्वे प्रशासनाने तो निधी देण्याची तयारीही दाखवली आहे. मात्र त्यामुळे पुलास शॉक लागण्याची शक्यता रेल्वेच्याच तांत्रिक विभागाने व्यक्त केली आहे. अर्थात कोणताही पर्याय निवडून पुलाचे काम मार्गी लागण्यास आता किमान सहा महिने लागणार हे उघड आहे.
स्कायवॉक प्रवाशांसाठी की कंत्राटदारांसाठी ?
गेल्या काही वर्षांत डोंबिवली ते बदलापूर या रेल्वे स्थानकांमध्ये मोठमोठे स्कायवॉक उभारण्यात आले. रेल्वे स्थानकांमधील प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी मोठमोठे स्कायवॉक उभारण्यात आले. मात्र आता त्यांची प्रत्यक्ष उपयोगिता पाहता हे स्कायवॉक प्रवाशांच्या सोयीसाठी उभारले की कंत्राटदारांच्या असा प्रश्न उपस्थित होतो. कल्याणच्या स्कायवॉकवर फेरीवाल्यांनी आक्रमण केले आहे. उल्हासनगर येथील भल्या मोठय़ा स्कायवॉकवर कोणत्याही वेळी पाहिले तरी फारसे प्रवासी नसतात. त्यामुळे या एकांताचा फायदा अनेक प्रेमीयुगुले घेताना दिसतात. अंबरनाथ स्थानकातला स्कायवॉक तर केवळ पश्चिम विभागापुरता आणि तोही अत्यंत गैरसोयीचा आहे. मात्र दुसरा कोणताही पर्याय नसल्याने अंबरनाथकरांना याच पुलावरून ये-जा करावी लागते.

Story img Loader