मुंबई आणि परिसरात शनिवारी रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेमार्गावर रविवारी सकाळी लवकरच पाणी तुंबले. गेल्या काही वर्षांत करीरोड, परळ, चिंचपोकळी, भांडूप या जागा पाणी तुंबण्यासाठी प्रसिद्ध होत्या. यंदा तेथे पाणी तुंबलेच. पण यंदा मध्य रेल्वेमार्गावर पाणी तुंबण्याच्या काही नव्या जागाही आढळल्या. मस्जिद, सँडर्हस्ट रोड, भायखळा या स्थानकांदरम्यान यंदा नव्याने पाणी तुंबले. त्याचप्रमाणे घाटकोपर, विक्रोळी या स्थानकांजवळही पाणी तुंबल्याने त्याचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला.
घाटकोपर-विक्रोळी या स्थानकांबाहेर नव्याने अनेक इमारती झाल्या आहेत. या इमारतींमुळे रेल्वेमार्ग आणि रेल्वे स्थानक सखल भागांत गेले आहे. त्यामुळे जोरदार पाऊस पडल्यानंतर या स्थानकांबाहेरील रस्त्यांवर साचलेले पाणी रेल्वेप्लॅटफॉर्मवरून रेल्वेमार्गावर अक्षरश: धबधब्यासारखे पडताना यंदा मुंबईकरांनी पाहिले.
रविवारच्या पावसामुळे मध्य रेल्वेची वाताहत झाली असताना पश्चिम रेल्वे मात्र थोडय़ा उशिराने, पण चालू होती. समुद्राच्या जवळ असूनही पश्चिम रेल्वेमार्गावर कुठेही पाणी तुंबले नाही. त्यामुळे मध्य रेल्वेच्या ‘नालेसफाई’, ‘स्वच्छता’, ‘पावसाळ्यापूर्वीची कामे’ वगैरे दाव्यांचा फोलपणा उघड झाला.
पश्चिम रेल्वे सुरळीत चालू असताना मध्य रेल्वेवर ही परिस्थिती का ओढावली, याचे उत्तर देताना नवनियुक्त मुख्य जनसंपर्क अधिकारी अतुल राणे यांनी मुंबईच्या भौगोलिक परिस्थितीकडे लक्ष वेधले. मध्य रेल्वेवर पाणी भरले असताना पश्चिम रेल्वेमार्गावर अशी परिस्थिती नसणे, ही गोष्ट अनेक वर्षांपासून घडत आली आहे. मध्य रेल्वेमार्ग हा मुंबईच्या मध्यावर आहे. हा सखल भाग असल्याने या भागात पाणी लवकर भरते, असे राणे म्हणाले.
रविवारच्या पावसामुळे रस्त्यांवरही मोठय़ा प्रमाणात पाणी तुंबले होते. त्यामुळे रेल्वेमार्गावरील पाणी बाहेर पडण्यास मार्ग नव्हता. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पुढील दीड ते दोन तासांत पाणी ओसरले होते. त्यामुळे या बाबतीत मध्य रेल्वे प्रशासनाला दोषी धरता येणार नाही, असेही राणे यांनी स्पष्ट केले.
रेल्वेने केलेल्या या खुलाश्यामुळे सामान्य प्रवाशांचे मात्र समाधान होत नाही. रेल्वेने नालेसफाई केली. मात्र नाल्यातून बाहेर आलेला कचरा रेल्वेमार्गाच्या कडेलाच टाकला. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर हा कचरा पुन्हा नाल्यात जाऊन पाणी तुंबले, असे ठाण्याहून रोज प्रवास करणाऱ्या सुरेंद्र महाजन यांनी सांगितले. मध्य रेल्वेच्या प्रवाशांना आता या गोष्टीची सवय झाली आहे. रेल्वे प्रशासनाला मात्र प्रवाशांच्या हालअपेष्टांशी काहीच देणेघेणे नाही, अशी प्रतिक्रिया नीता साळवी यांनी व्यक्त केली. मात्र रविवारी मध्य रेल्वेने किमान उद्घोषणा करण्याचे सौजन्य दाखवत आम्हाला आश्चर्याचा धक्का दिल्याचेही त्यांनी सांगितले.

Story img Loader