महाराष्ट्रातून केवळ नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाला यावर्षी १० जागांचा कोटा वाढवून मिळाल्याने ५० विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाला प्रवेश घेणे शक्य होणार आहे. स्वतंत्र इमारत, त्यातील विविध विभाग, उपकरणे आणि दर महिन्याला हजारो रुग्णांचा ओघ आणि व्यवस्थित उपचार पद्धती पाहता भारतीय दंत परिषदेने(डीसीआय) या दहा जागांसाठी होकार भरला आहे. कित्येक वर्षे ३० जागा होत्या. त्यानंतर ही संख्या वाढून ४० जागांपर्यंत पोहोचली. त्यामुळे आता मिळणाऱ्या १० जागांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
यावर्षी ३१ मे आणि १ जूनला महाविद्यालयाची पाहणी करून डीसीआयची चमू प्रभावित झाली. शासकीय दंत महाविद्यालयात नागपूरबरोबरच औरंगाबादच्या शासकीय दंत महाविद्यालयानेही १० जागा वाढवून मिळाव्यात म्हणून डीसीआयकडे पत्रव्यवहार केला होता. मात्र, त्यांना त्या मिळाल्या नाहीत. स्वत: डीसीआयचे असे म्हणणे आहे की महाविद्यालयात एक तर ५० किंवा १०० जागा असाव्यात. नागपूर विभागात सध्या चार दंत महाविद्यालये आहेत. त्यापैकी दोन खाजगी व दोन शासकीय आहेत.महाराष्ट्रात ३२ दंत महाविद्यालये आहेत. त्यापैकी तीन शासकीय दंत महाविद्यालये आहेत तर मुंबईतील नायर महाविद्यालय तेथील महापालिका  चालवते. या सर्व महाविद्यालयांमधील प्रवेश वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयामार्फत(डीएमईआर) केले जातात.
 प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची लांबलचक रांग असते. मात्र, जागा कमी आणि विद्यार्थी जास्त अशी स्थिती असल्याने विद्यार्थ्यांना दंत महाविद्यालयात प्रवेश घेता येत नाहीत. महाविद्यालयात आणखी दहा जागांची भर पडणार असल्याने गरीब विद्यार्थ्यांना खाजगी महाविद्यालयांमध्ये न जाता केवळ गुणवत्तेच्या निकषावर प्रवेश घेणे समाधान मानावे लागते. खाजगी महाविद्यालयांमध्ये दीड ते दोन लाख प्रवेश शुल्क एकीकडे भरावे लागत असताना दुसरीकडे केवळ ४० हजार रुपयांमध्ये प्रवेश मिळणे शक्य असलेल्या शासकीय दंत महाविद्यालयात आणखी जागांची भर पडणार असल्याने गरीब, होतकरू विद्यार्थ्यांंना त्याचा लाभ मिळणार आहे. गुणवत्तेच्या आधारावरच डीएमईआर दरवर्षी प्रवेश करते. दंतशास्त्राकडे विद्यार्थ्यांचा ओढाही चांगला आहे. या दहा जागांचा निश्चितच विद्यार्थ्यांना फायदा होईल. कागदोपत्री प्रक्रिया अद्याप अपूर्ण असून येत्या १५ जुलैपर्यंत ती पूर्ण करून डीसीआयला सादर करायची आहे. त्यानंतरच त्या १० जागांवरही प्रवेश करणे शक्य होणार असल्याचे शासकीय दंत महाविद्यालयाच्या कार्यकारी अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर यांनी सांगितले.

Story img Loader