० वाहतूक पोलिसांचे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष
० सुसंस्कृत डोंबिवलीकरांचा असंस्कृतपणा
० एका खेपेत मिळताहेत ३२ ते ४० रुपये
कल्याण-डोंबिवलीत मीटरसक्ती लागू करण्यात आली असली तरी रिक्षाचालकांची एका रिक्षात चार ते पाच प्रवासी कोंबण्याची प्रवृत्ती मीटरसक्तीच्या मुळावर आली आहे. एका खेपेत रिक्षाचालकाला या प्रवाशांकडून प्रत्येकी ८ रुपये या प्रमाणे ३२ ते ४० रुपये मिळत असल्याने रिक्षाचालकही मीटर डाऊन करण्यास नकार देत आहेत. या सर्व प्रकाराकडे वाहतूक पोलिसांनी ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष केले आहे.
रिक्षातून तीन प्रवाशांची वाहतूक करण्याचा नियम/कायदा कल्याण-डोंबिवलीतील रिक्षाचालकांनी धाब्यावर बसवला आहे. वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिच्चून हे रिक्षाचालक एका वेळी रिक्षातून चार ते पाच प्रवाशांची ने-आण करताना पाहायला मिळत आहेत. काही वेळेस पकडले जाऊ नये, म्हणून ज्या ठिकाणी वाहतूक पोलीस कर्तव्यावर उभा असेल त्या ठिकाणापासून काही अंतरावर चौथ्या/पाचव्या प्रवाशांना उतरवून दिले जात आहे. आपल्या सुशिक्षित आणि सुसंस्कृतपणाचा टेंभा मिरविणारे कल्याण-डोंबिवलीकर येथे मात्र असंस्कृतपणा दाखवून नियमबाह्य़ वर्तन करत आहेत. त्यामुळे चार ते पाच प्रवासी कोंबून त्यांची ने-आण करणाऱ्या रिक्षाचालकाबरोबरच त्या रिक्षात बसून प्रवास करणारे प्रवासीही तेवढेच दोषी आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी आपला ढिम्मपणा सोडून आता रस्त्यावर उतरावे आणि रिक्षाचालकांबरोबरच रिक्षात बसलेल्या प्रवाशांकडूनही दंड वसूल करण्याची धडक मोहीम राबवावी, अशी अपेक्षा सुजाण प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
एका कुटुंबातील तीन सदस्य रिक्षात बसले तरी रिक्षाचालक मीटर न टाकता त्यांच्याकडूनही प्रत्येकी ८ रुपयांप्रमाणे पैसे उकळत असल्याचा अनुभव येत आहे. किमान अंतरासाठी फक्त १९ रुपये होत असतील तर साहजिकच रिक्षाचालक मीटर न टाकता एका खेपेत चार ते पाच प्रवासी कोंबून जास्त पैसे मिळविण्याचा प्रयत्न करणारच. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी तातडीने अशा रिक्षाचालकांच्या विरोधात कारवाई करावी, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.
सकाळी साडेनऊ-दहा वाजेपर्यंत आणि रात्री साडेआठ-नऊ वाजल्यानंतर रिक्षाचालकांच्या बेशिस्तीला आणि एका रिक्षात चार ते पाच प्रवासी कोंबून वाहतूक करण्याच्या प्रकाराला अक्षरश: ऊत येत आहे. डोंबिवली पश्चिमेला विष्णूनगर पोलीस ठाण्यासमोर (होम प्लॅटफॉर्म) वरून बाहेर पडताना तर प्रवासी आणि रस्त्यावरून चालणारे प्रवासी यांच्या नाकीनऊ येत आहेत. कारण येथे असलेल्या वाहतूक पोलिसाची पाठ वळली की रात्री साडेआठ-नऊ वाजल्यानंतर या परिसराला तसेच पं. दीनदयाळ चौकाला मुजोर रिक्षाचालकांचा विळखा पडलेला असतो. विष्णुनगर पोलीस ठाण्यातील गस्तीपथकातील पोलिसांनी दररोज काही वेळाच्या अंतराने येथे गस्त घातली तरी रिक्षाचालकांच्या या बेशिस्तीला आळा बसेल, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.
आरटीओने वटारले ‘डोळे’
मीटर डाऊन न करणाऱ्या रिक्षाचालकांच्या विरोधात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे आणि त्यांचे सहकारी अखेर रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवलीत त्यांनी केलेल्या कारवाईत ६९ रिक्षाचालकांकडून २४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तीन रिक्षाचालकांनी मीटरचे रिकॅलीबरेशन करून न घेतल्याप्रकरणी त्यांच्याकडून प्रत्येकी ८ हजार रुपये यानुसार दंड वसूल करण्यात आला आहे.