राज्यात १०० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करत लोकसहभागातून हे काम करण्यासाठी नाममात्र दरात रोपे उपलब्ध करण्याची धडपड सुरू असली तरी रोपे बनविण्याच्या प्रक्रियेत मोठय़ा प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. नाशिक जिल्ह्याचा विचार करता या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील रोपवाटिकांमध्ये तीन वर्षांत ५० लाख ११ हजार रोपे तयार करण्यात आली. त्यातील दोन लाख ४७ हजार रोपांची विक्री झाली तर २३ लाख ६४ हजार रोपे विविध यंत्रणांना मोफत वाटप करण्यात आली. रोपे निर्मितीच्या प्रक्रियेत थोडी थोडकी नव्हे तर ६ लाख २४ हजार ६५० रोपांचे नुकसान झाल्याची माहिती खुद्द सामाजिक वनीकरण विभागाने दिली आहे. म्हणजे, वर्षांकाठी सरासरी दोन लाख रोपांचे नुकसान होत असून ती बनविण्यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत झालेला खर्च पाण्यात गेला आहे.
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाला सुरुवात झाल्यानंतर सामाजिक वनीकरण विभागाने वृक्ष लागवडीसाठी शिल्लक असणारी रोपे नागरिकांनी खरेदी करावी, असे आवाहन केले आहे. वृक्ष संवर्धनास प्रोत्साहन देण्यासाठी मागील तीन वर्षांपासून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. लोकसहभागातून वृक्ष लागवडीचे काम करण्यासाठी लहान पिशवीतील रोप प्रतिएक रुपयात उपलब्ध करून देण्यात येते. इतकेच नव्हे तर, शासनाचे सर्व विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका तसेच शाळा, शेतकरी, स्वयंसेवी संस्था, साखर कारखाने आदींना मोफत स्वरुपात रोपे दिली जात असूनही शिल्लक राहणाऱ्या रोपांची संख्या भलीमोठी आहे. रोपांच्या खरेदीस प्रतिसाद मिळत नसल्याने काही रोपांची विक्री होऊ शकत नाही. परिणामी, ते रोपवाटिकेत मोठी होतात. त्यांची मुळे जमिनीत जाऊन ते काढणे अवघड बनते. पेठ तालुक्यातील रोप वाटिकेत मध्यंतरी हा प्रकार निदर्शनास आला होता. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत २०११-१२ वर्षांपासून जिल्ह्यातील २६ रोपवाटिकांमध्ये रोपे तयार काम हाती घेण्यात आले. पहिल्या वर्षांत तयार झालेल्या रोपांची विक्री न झाल्यामुळे दुसऱ्या वर्षी म्हणजे २०१२-१३ मध्ये सामाजिक वनीकरण विभागाने रोपेच तयार करणे थांबविले.
रोपवाटिकांमध्ये प्रामुख्याने करंज, काशिद, आवळा, सिसू, गुलमोहोर, जांभुळ, वड, पिंपळ, बेहडा, बेल, अडुळसा, कैलासपती, सफेद गुंज, लाल, गुंज, शर्मी, रक्तरोहिडा, अर्जुन सादडा, गुळवेल, शिकेकाई, अश्वगंधा, हिरडा आदी प्रजातीचे रोपे तयार केली जातात. मागील तीन वर्षांत २६ रोपवाटिकांमध्ये ४३ लाख २५ हजार १६७ लहान तर सहा लाख ८६ हजार उंच रोपे तयार करण्यात आली. त्यातील दोन लाख १० हजार ८४८ लहान तर ३९ हजार ३६६ रोपांची विक्री झाली. तयार झालेल्या रोपांपैकी १९ लाख २१ हजार ६६२ लहान तर ४ लाख ४२ हजार ५५५ मोठी रोपे विविध यंत्रणांना वाटप करण्यात आली. सामाजिक वनीकरण विभागाने साडे चार लाख लहान रोपांचा उंच करण्यासाठी वापर केला तर ५१ हजार ७०७ रोपे रोपवनासाठी वापरली. तसेच १७ हजार ९६९ उंच रोपांचाही विभागासाठीच वापर करण्यात आला. तयार होणारी रोपे आणि विक्री यांचे प्रमाण पाहिल्यास त्यात बरीत मोठी तफावत दिसते.  या प्रक्रियेत रोपांचे मोठय़ा प्रमाणात नुकसानही झाले आहे. ५ लाख ९२ हजार ९८५ लहान तर ३१ हजार ६६५ उंच रोपांचे नुकसान झाल्याची बाब खुद्द विभागाने मान्य केली आहे. विविध रोपवाटिकांमध्ये सध्या लहान १० लाख ९७ हजार ९६५ तर एक लाख ५४ हजार ४४५ उंच रोपे शिल्लक आहेत.

सामाजिक वनीकरण विभागातर्फे आज रोपांची विक्री
सामाजिक वनीकरण विभागातर्फे शनिवारी इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक या ठिकाणी सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत अडुळसा, हादगा, शेवगा, शिकेकाई, रक्तरोहिडा, अश्वगंधा, कैलासपती, बेहडा, रिठा, शमी, बेल, गोकर्ण, गुळवेल डायसपायरस, गवती चहा, पिंपळ, जास्वंद, अनंत, खाया, आदी वृक्षांची रोपे सवलतीच्या दरात उपलब्ध होतील. प्रती रोप किमान सहा ते कमाल ४१ रुपयापर्यंत ही रोपे मिळतील. नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन लागवड अधिकारी एम. टी. शर्मा यांनी केले आहे. जिल्ह्यातील रोपवाटिकांमध्ये करंज, काशिद, आवळा, सिसू, गुलमोहोर, जांभुळ, वड, पिंपळ प्रजातींची १० लाख ९७ हजार ९६५ लहान रोपे तर १ लाख ५४ हजार ४४५ उंच रोपे उपलब्ध आहेत. गंगापूर रस्त्यावरील गंगाघाट रोपवाटिकेत करंज, आवळा, वड, पिंपळ पळस, बेहडा,
बेल, अडुळसा, कैलासपती, सफेद गुंज, लाल गुंज, शर्मी, रक्तरोहिडा, शिकेकाई, गोकर्ण, अश्वगंधा व हिरडा आदी प्रजातींची ८० हजार रोपे उपलब्ध आहेत.

Story img Loader