* पोलिसांकडे आरोपी, जामीनदारांची संपूर्ण माहितीच नाही!
* न्यायालयाच्या आदेशानंतर ४४६ सापडले
पोलिसांनी आरोपींना अटक केल्यावर त्यांची पुरेशी माहिती न ठेवल्याने हेच आरोपी जामीन मिळवून फरारी होत आहेत. मुंबई पोलिसांच्या हद्दीतून जामीनावर सुटलेले अडीच हजारांहून अधिक आरोपी फरार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
विविध गुन्ह्यांमध्ये पोलीस आरोपींना अटक करत असतात. या आरोपींना काही काळानंतर न्यायालयातून जामीन मिळतो. पण यापैकी अनेक आरोपी नंतर फरारी होतात. त्यांच्याबद्दलची पुरेशी माहिती नसल्याने पोलीस केवळ त्यांना फरार घोषित करण्यापलीकडे काहीच करू शकत नाही.
पोलीस काय करतात
जामीनावर सुटलेला एखादा आरोपी सुनावणीसाठी तारखेला हजर राहिला नाही तर पोलीस टप्प्याटप्प्याने पुढील कारवाई करतात
१) सुरुवातीला एक साधी नोटीस पाठवली जाते
२) नंतर समन्स पाठवले जाते
३) जामीनपात्र वॉरंट पाठवले जाते
४) अजामीनपात्र वॉरंट पाठवण्यात येते
५) तरीही तो आरोपी आला नाही तर मग ‘प्रोक्लोमेशन ऑर्डर’ काढून त्याला फरारी घोषित केले जाते
पोलिसांचा बेजबाबदारपणा
एखाद्या आरोपीला अटक केल्यावर त्याची संपूर्ण आणि खात्रीशीर माहितीची नोंद पोलिसांनी ठेवणे अपेक्षित आहे. परंतु त्याचा धड पत्ताही नीट लिहून घेतला जात नाही. उदा. माहीम रेल्वेस्थानकासमोरची झोपडपट्टी असा पत्ता असल्यावर नंतर जेव्हा या आरोपीला शोधायला पोलीस जातात तेव्ही ती झोपडपट्टीच गायब झालेली असते. आरोपींना जो जामीनदार असतो त्याचीही संपूर्ण माहिती नसते. मग आरोपी फरारी झाल्यावर जामीनदाराला शोधायला गेल्यावर त्याचाही पत्ता नसतो.
न्यायालयांतील खटल्यांवर परिणाम
आरोपी न्यायालयात हजर रहात नसल्याने सुनावणी पुढे ढकलली जाते आणि खटला रेंगाळत राहतो. शेकडो आरोपी फरार असल्याचे उत्तर मिळत असल्याने न्यायालयानेही पोलिसांना चांगलेच फटकारले होते. उच्च न्यायालयाने तर या फरारी आरोपींनी शोधण्याचे आदेशच पोलिसांना दिले आहेत.
४४६ सापडले, पण १२८ मयत निघाले
प्रतिबंधक गुन्हे शाखेने फरारी आरोपींना शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यांनी मुंबईच्या सर्व पोलीस ठाण्यांना त्यांच्या हद्दीतील फरारी गुन्हेगारांना शोधण्याचे आदेश काढले आहेत. २० डिसेंबर २०१२ पासून सुरू झालेल्या या मोहिमेत मार्च पर्यंत ४४६ फरारी आरोपी शोधण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती पोलीस उपायुक्त आनंद मांडय़ा यांनी दिली. यातील गंभीर गुन्ह्यातील (खून, बलात्कार, अपहरण, खंडणी, दरोडे इत्यादी) आरोपी १६२ असून किरकोळ गुन्ह्यांतील आरोपी २८४ आहेत. परंतु त्यातील १२८ आरोपी फरारी असतानाच मृत्यू पावल्याचे निष्पन्न झाले आहे. हे १२८ फरार आरोपी मृत्यू पावल्याचे जर पोलिसांनी आधी शोधून काढले असते तर १२८ प्रकरणांचा निकाल केव्हाच लागला असता आणि न्यायालयाचा तसेच सरकारी यंत्रणेचा अमूल्य वेळ वाचला असता. यातील अनेक आरोपी नाव बदलून मुंबईत आणि उत्तर प्रदेश वा अन्य राज्यांत राहात होते. एका प्रकरणात तर पोलिसांनी १९८२ पासून फरारी असलेल्या आरोपीला पकडून आणले आहे.
पोलिसांनी आरोपीला अटक केल्यावर त्याची संपूर्ण माहिती, त्याच्या जामीनदाराची माहिती ठेवली तर जामीनावर सुटल्यावर तो फरारी झाल्यावर लगेच पकडता आले असते. परंतु पोलिसांकडून तेवढी तत्परता आणि जबाबदारपणा दाखवला जात नसल्याने आरोपी सहजगत्या फरारी होतात.
जामिनावर सुटलेले अडीच हजारांहून अधिक आरोपी फरार
* पोलिसांकडे आरोपी, जामीनदारांची संपूर्ण माहितीच नाही! * न्यायालयाच्या आदेशानंतर ४४६ सापडले पोलिसांनी आरोपींना अटक केल्यावर त्यांची पुरेशी माहिती न ठेवल्याने हेच आरोपी जामीन मिळवून फरारी होत आहेत. मुंबई पोलिसांच्या हद्दीतून जामीनावर सुटलेले अडीच हजारांहून अधिक आरोपी फरार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
First published on: 20-03-2013 at 02:10 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More then 2500 accused are absconded