निराधार, वृद्धांची प्रतीक्षा कायम
निराधार, वृद्ध, निराश्रितांसाठी केंद्र व राज्य सरकारांकडून वेगवेगळ्या योजनांतर्गत मिळणारा निधी दुष्काळातही मार्चअखेरीलाच कसाबसा उपलब्ध झाला खरा, पण तो संगणकातच अडकला! अर्थसंकल्पीय प्रणालीतून ‘बीडीएस’मधून सुमारे ८ कोटी १२ लाखांचा निधी काढता येत नसल्याने लाभार्थी या योजनेपासून वंचितच राहिले. निधी काढताना ‘निगेटिव्ह एक्सपेंडिचर इज नॉट अलाउड टू स्कीम’ असा संदेश दिसत असल्याने गेल्या ३ महिन्यांपासून निधीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या निराधार-वृद्धांना पैसे मिळण्यासाठी आणखी काही काळ कळ सोसावी लागणार आहे. ‘दुष्काळात तेरावा’ ही म्हण सध्या या योजनांसाठी लागू असल्याचे अधिकारीही सांगतात.
इंदिरा गांधी यांच्या नावाने केंद्र सरकारकडून वृद्ध, निराश्रित व वृद्ध अपंगांसाठी प्रतिमाह २०० रुपये दिले जातात. गेल्या अनेक दिवसांपासून ही रक्कम दिली गेली नव्हती. बीडीएस प्रणालीवर या योजनेसाठी १ कोटी ३८ लाख ८४ हजार निधी प्राप्त झाला. त्याचे वितरणही झाले. सोयगाव वगळता इतर तालुक्यांसाठी वितरित केलेला हा निधी अजूनही काढता आला नाही. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेचा ३ कोटी ७३ लाख ८७ हजार, तर संजय गांधी निराधार योजनेसाठी ३ कोटी १ लाख ८१ हजार निधी तालुकास्तरावर वितरित झाला.
निधी वितरणाचे आदेश काढल्यानंतर बीडीएस प्रणालीवर रक्कम दिली जाते. मात्र, या रकमेची देयके सादर करण्यासाठी बीडीएसमधून अर्थसंकल्पीय तरतूद काढण्याची परवानगी कोषागार विभागाकडे असणे आवश्यक आहे. या सर्व योजनांचा खर्च गेल्या ४ दिवसांपासून एका संदेशामुळे होऊ शकला नाही. योजनेंतर्गत निधीची तरतूद आहे की नाही, असा संभ्रम यामुळे निर्माण झाला. या अनुषंगाने जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांना विचारले असता, या निधी वितरणात नक्की काय समस्या आहे हे तपासले जाईल, असे त्यांनी सांगितले.