हिंस्र वन्यजीवांचे अस्तित्व असलेल्या जंगलक्षेत्रात राहणाऱ्या आदिवासींना ‘जंगलात जाऊ नका’, असा सल्ला दिला जात असताना सातपुडा फाऊंडेशनने सुमारे शंभर स्वयं मदत गटांच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षांत १ हजार आदिवासी युवकांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. महाराष्ट्रासह अन्य राज्यतील व्याघ्र प्रकल्पांमध्ये फाऊंडेशनने ५० स्वयं बचत गटांच्या साह्य़ाने ५ हजार तरुणांना प्रशिक्षित केले असून, त्यांच्या चेहेऱ्यावरील स्वयंसिद्धतेचे हास्य कुपोषणग्रस्त आणि मागास मेळघाटातील हिरवळ म्हणून ओळखले जात आहे.
गेल्या सहा वर्षांत एकटय़ा चंद्रपूर जिल्ह्य़ात वाघ आणि बिबटय़ांच्या हल्ल्यात ८३ लोकांचा जीव गेला तर २००८ पासून ५८६१ पाळीव जनावरांचा फडशा पाडण्यात आला. जंगलावर दैनंदिन जीवन अवलंबून असलेल्या वनवासींना जंगलात जाण्यापासून रोखणे हा कायम उपाय नाही, त्यांना पर्यायी रोजगार उपलब्ध करून दिल्यास वारंवार जंगलात जाण्याची गरज पडणार नाही, या उद्देशाने सातपुडा फाऊंडेशन गेल्या सहा वर्षांपासून स्वयंरोजगाराचा अभिनव उपक्रम राबवित आहे. मानव-वन्यप्राणी संघर्षांची तीव्रता यामुळे कमी होण्यात यामुळे बरीच मदत होईल, असे फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष किशोर रिठे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
निधी आणि स्रोतांच्या मर्यादेमुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील पाच व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमध्ये येणाऱ्या ८० गावांमध्ये हा उपक्रम राबवावा लागत आहे. पेंच, कर्माझरी, सातपुडा, पचमढी, ताडोबा अंधारी आणि कान्हा व्याघ्र प्रकल्पातील गावे यात सहभागी करून घेण्यात आली आहेत. या गावांची एकूण लोकसंख्या ५४,१०० असून, त्यापैकी १ हजार बेरोजगारांना उदरनिर्वाहाच्या संधी उपलब्ध करून देण्यात फाऊंडेशनला यश मिळाले आहे. गौण वनउपजांवर अवलंबून असलेल्या अत्यल्प उत्पन्न गटातील आदिवासींना रोजगार प्रशिक्षण आणि स्वयंरोजगार अशा दोन्ही आघाडय़ांवर सामावून घेण्यात येत आहे, अशी माहिती पाच व्याघ्र प्रकल्पांमध्ये रोजगार उपलब्धतेचा उपक्रम राबविणारे सातपुडा फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक गिरी वेंकटेश्वरन यांनी दिली.
स्वयंरोजगारासाठी आदिवासींना वाहन चालक प्रशिक्षण, शिवणकाम आणि एब्रॉयडरी प्रशिक्षण तसेच मधमाशा पालन असे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मध्य प्रदेशच्या हौशंगाबाद जिल्ह्य़ातील सातपुडा व्याघ्र प्रकल्पातील ४२९ बेरोजगार तरुणांना २००७-१३ या काळात ३१ स्वयं मदत गट आणि ३१ प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून थेट रोजगार देण्यात आला आहे, असे सातपुडा फाऊंडेशनचे पचमढीचे संवर्धन अधिकारी अशफाक आर्बी यांनी सांगितले. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील पेंच (दोन्ही टप्पे) व्याघ्र प्रकल्पात संवर्धन अधिकारी असलेले अनुप अवस्थी यांनी दिलेल्या माहितीनुसार २००७ साली आदिवासींना पर्यायी उदरनिर्वाह उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू झाला तेव्हापासून १५२ आदिवासी युवक स्वयंभू झाले आहेत. त्यांनी एकतर स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला आहे किंवा नजीकच्या टुरिस्ट रिसोर्टस्   किंवा  हॉटेलांमध्ये नोकरी मिळाली आहे.
या तरुणांना हॉटेल व्यवस्थापन आणि स्वयंपाकशास्त्राशी संबंधित प्रशिक्षण देण्यात आल्यानंतर त्यांना रोजगाराचे नवे मार्ग खुले झाले. शिवाय घरकाम, आणि कॅटरिंग, क्राफ्ट, बॅग, मेणबत्ती बनविण्याचे प्रशिक्षणही दिले जात आहे. सातपुडा फाऊंडेशनने २००६ साली रोजगार सेल स्थापन करून वर्षभर पाच व्याघ्र प्रकल्पांमधील आदिवासी युवकांना नेमकी कोणत्या रोजगाराची आवश्यकता आहे, याचे सविस्तर सर्वेक्षण केले. त्यानंतर रोजगाराभिमुख कार्यक्रमांची आणि प्रशिक्षण योजनांची आखणी करण्यात आली, असे गिरी यांनी स्पष्ट केले.     (क्रमश:)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More then thousands students gets the employment because of five save tiger project
Show comments