बच्चे कंपनीमध्ये प्रिय ठरलेल्या स्पायडरमॅन, सुपरमॅन, शक्तीमॅनच्या धर्तीवर आता पालिकेचा ‘मच्छरमॅन’ मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेणार आहे. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहिरात आणि प्रसिद्धीपत्रकांच्या माध्यमातून हा ‘मच्छरमॅन’ प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे महत्त्व मुंबईकरांना पटवून देणार आहे. तसेच धूम्रफवारणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही ‘मच्छरमॅन’चे स्वरुप देण्याचे घाटत आहे. डास प्रतिबंधक उपाययोजना करण्यात कमालीची उदासीनता असलेल्या पालिकेने आता हिवताप आणि डेंग्युचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘मच्छरमॅन’चा खटाटोप घातला आहे. मात्र प्रशासनाने याबाबत अंधारात ठेवल्यामुळे आरोग्य समितीत ‘मच्छरमॅन’ला विरोध करण्याचा निर्णय नगरसेवकांनी घेतला आहे.
हिवतापाच्या साथीचा प्रादुर्भाव ५० टक्क्य़ांवर आणण्यात महापालिका यशस्वी ठरली आहे. आता पावसाळा जवळ आल्यामुळे पुन्हा हिवतापाने डोके वर काढू नये यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत. डास प्रतिबंधक उपाययोजना अधिक प्रभावीपणे करण्यासाठी पालिकेने ‘मच्छरमॅन’ची निर्मिती करण्याचा विचार पालिकेच्या आरोग्य विभागात सुरू आहे. हा ‘मच्छरमॅन’ जाहिरात आणि प्रसिद्धीपत्रकांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचणार आहे. पाण्याचे पिंप, बादली, तसेच पाणी साचणाऱ्या ठिकाणी होणाऱ्या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी ‘मच्छरमॅन’ मुंबईकरांना सावध करणार आहे. दूरचित्रवाणी आणि आकाशवाणीवरुन ‘मच्छरमॅन’ लोकांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देणार आहे.
सध्या मुंबईमध्ये धूम्रफवारणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘मच्छरमॅन’च्या स्वरुपात लोकांसमोर सादर करण्यात येणार आहे. हा ‘मच्छरमॅन’ मुंबईच्या कानाकोपऱ्यात फिरून धूम्रफवारणीचे काम करतील. धूम्रफवारणीच्या कामात मुंबईकरांकडूनही त्यांना चांगले सहकार्य मिळेल, असा आशावाद पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मुंबईकरांच्या आरोग्याबाबत घेण्यात येणाऱ्या निर्णयांना आरोग्य समितीची मंजुरी घेतली जाते. किमान निर्णयांची कल्पना समितीच्या बैठकीत सदस्यांना दिली जाते. मात्र ‘मच्छरमॅन’च्या निर्मितीबाबत समिती सदस्यच नव्हे, तर दस्तुरखुद्द अध्यक्षही अंधारातच आहेत. पावसाळ्यात करण्यात येणाऱ्या सर्व उपाययोजनांची माहिती आपल्याला आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. मात्र ‘मच्छरमॅन’ या संकल्पनेबाबत काहीच कळविलेले नाही, असे आरोग्य समिती अध्यक्ष गीता गवळी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. यामुळे आरोग्य समिती गुरुवारी होणाऱ्या बैठकीत ‘मच्छरमॅन’लाच पळवून लावण्याची चिन्हे आहेत.

Story img Loader