* ब्रम्हपुरी नगर पालिका निवडणूक
* वडेट्टीवार व गड्डमवारांना मतदारांनी नाकारले
ब्रम्हपुरी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून बघितल्या गेलेल्या ब्रम्हपुरी नगर पालिका निवडणुकीत भाजपने सर्वाधिक १० व स्वतंत्र विकास आघाडीने ९ जागांवर विजय मिळवून कॉंग्रेस व राष्ट्रवादीचा धुव्वा उडविला आहे. मतदारांनी कॉंग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार व राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप गड्डमवार यांचे नेतृत्व साफ नाकारल्याने कॉंग्रेसला केवळ एक जागा, तर राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आलेला नाही. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रा.अतुल देशकर व स्वतंत्र विकास आघाडीचे अशोक भय्या यांना घवघवीत यश मिळाले.
ब्रम्हपुरी नगर पालिकेच्या ५ प्रभागातील २० जागांसाठी काल रविवारी मतदान झाल्यानंतर आज राजीव गांधी सभागृहात सकाळी आठ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली. अवघ्या काही तासात प्रभाग क्रमांक एक व दोनचे निकाल जाहीर झाले. या दोन्ही प्रभागात भाजपचे आठ नगरसेवक विजयी झाले. प्रभाग क्रमांक १ मध्ये भाजपच्या सुवर्णलता बढोले, भाजपचे ब्रम्हपुरी तालुकाध्यक्ष दीपक उराडे यांच्या पत्नी रिता उराडे, संजय मणीराम बावणकुळे व विक्रम रामचंद्र कावळे यांचा समावेश आहे, तर प्रभाग क्रमांक दोनमध्ये भाजपचे सुधीर राऊत, प्रशांत ताम्हण, यास्मीन लाखानी व अनधा दंडवते विजयी झाले. प्रभाग क्रमांक तीनमध्ये अशोक भय्या यांच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र विकास आघाडीचे स्वत: अशोक भय्या, नरेंद्र कामथे, योगिता बनपूरकर, प्रतिभा फुलझेले व प्रभाग क्रमांक चारमध्ये स्वतंत्र विकास आघाडीचे सतीश हमने, श्रीधर बोरकर, हेमलता अरविंद नंदूरकर व कॉंग्रेसच्या रश्मी तेशने विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक पाचमध्ये स्वतंत्र विकास आघाडीचे विजय ढोक, अर्चना खंडाते, अंजली उरकुडे व भाजपचे मनोज भुपाळ विजयी झाले. प्रभाग क्रमांक एकमध्ये भाजपचे संजय बावणकुळे अवघ्या पाच मतांनी व प्रभाग क्रमांक पाचमध्ये विकास आघाडीचे विजय ढोक दहा मतांनी विजयी झाल्याने या दोन्ही ठिकाणी फेरमतमोजणी करण्यात आली. मात्र, त्याचा निकालावर काहीही परिणाम झाला नाही. निवडणूक अधिकारी म्हणून दीपा मुधोळ यांनी काम पाहिले.
या नगर पालिका निवडणुकीकडे ब्रम्हपुरी नगरपालिका निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून बघितले गेले. त्यात कॉंग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार व राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप गड्डमवार यांचा पार धुव्वा उडला. त्याला कॉंग्रेस पक्षात पडलेली उभी फुट व राष्ट्रवादीमधील स्थानिक नेत्यांची विसंगती कारणीभूत ठरली आहे. गेल्या वेळची निवडणूक आमदार विजय वडेट्टीवार व अशोक भय्या यांनी एकत्रित लढली होती, परंतु यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये बिनसल्याने कांॅग्रेसची दोन गटात विभागणी झाली. त्याचा परिणाम वडेट्टीवार यांना कॉंग्रेसचा किल्ला एकाकी लढावा लागला. यात अशोक भय्या यांनी कॉंग्रेसच्या सर्व स्थानिक नेत्यांना सोबत घेत ९ जागांवर बाजी मारली, तर कॉंग्रेसला केवळ एकच जागा जिंकला आली. त्यातही माजी आमदार बाबासाहेब खानोरकर यांच्या पुण्याईवर त्यांची मुलगी रश्मी तेशने निवडून आल्या. कॉंग्रेसच्या मत विभाजनाचा नेमका फायदा भाजपला मिळाला आणि जिल्हाध्यक्ष आमदार प्रा.अतुल देशकर यांनी चालून आलेल्या संधीचे सोने करून १० जागा जिंकल्या. युवाशक्ती आघाडीने उमेदवार उभे न केल्याचा फायदाही भाजपला मिळाला. एकूणच या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रा.अतुल देशकर व स्वतंत्र विकास आघाडीचे अशोक भय्या यांना घवघवीत यश, तर वडेट्टीवार व गड्डमवार यांना दारुण पराभवाला सामोर जावे लागले. सर्व निकाल जाहीर होताच भाजप व स्वतंत्र विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

Story img Loader