रेल्वे गाडय़ा चालवत असताना भ्रमणध्वनी वापरण्यावर बंदी घालण्याच्या रेल्वे बोर्डाच्या परिपत्रकामुळे मोटरमन आणि ड्रायव्हर मंडळींमध्ये नाराजी वाढत असून हे परिपत्रक त्वरित मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. भ्रमणध्वनीला बंदी घालून आमच्या वैयक्तिक हालचालींवर निर्बंध आणण्यापेक्षा इंजिनांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जॅमर बसवा, अशी सूचनाही मोटरमन्सच्या संघटनेने केली आहे.
रेल्वे बोर्डाच्या दूरसंचार विभागाचे संचालक राकेश रंजन यांनी २७ डिसेंबर रोजी मोटरमन आणि ड्रायव्हर यांना भ्रमणध्वनीचा वापर करू नये, अन्यथा नोकरीवर गदा येईल, असा इशारा देणारे परिपत्रक काढले होते. या परिपत्रकामुळे रेल्वेच्या रनिंग स्टाफमध्ये (मोटरमन, गार्ड, ड्रायव्हर, सहाय्यक ड्रायव्हर) नाराजी पसरली आहे. आमच्या वैयक्तिक हालचालींवर लक्ष ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. रनिंग स्टाफच्या ‘नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वेमेन’ संघटनेने याचा निषेध केला असून हे पत्रक त्वरित मागे घेण्याची मागणी केली आहे. भ्रमणध्वनीवर बोलू नये हे योग्य असले तरी प्रत्यक्षात त्याचाच आधार अनेकदा आपत्कालीन परिस्थितीमध्ये करावा लागतो, याचा विचार रेल्वे बोर्डाने करणे आवश्यक आहे. भ्रमणध्वनी जवळ ठेवून त्याचा वापर होणार नाही असे होत नाही. त्यापेक्षा नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून इंजिनामध्ये किंवा उपनगरी गाडीच्या मोटरमन केबिनमध्ये जॅमर लावा म्हणजे भ्रमणध्वनी बंद राहतील, असे संघटनचे म्हणणे आहे.

Story img Loader