ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई हजारे यांच्या दि. १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दहाव्या पुण्यातिथीनिमित्त राळेगसिद्घीचे ग्रामस्थ स्वत:च्या आईचे बँकेत खाते उघडून त्यातील पैसे वापरण्याचा अधिकार आईला देणार आहेत. सरपंच जयसिंग मापारी यांनी ही माहिती दिली.
मातोश्री हजारे यांचा स्मृतिदिन दरवर्षी विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. या वर्षीही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, राज्य सरकारच्या आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हे कार्यक्रम होणार आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व पवार यांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिवसभर या शिबिरात हजारे समर्थक रक्तदान करतील. याच दरम्यान ग्रामस्थ आपल्या आईचे बँकेत खाते उघडून त्यात पुरेशी रक्कम जमा करतील. ही रक्कम आईला वापरण्याचा अधिकार देण्यात येईल. त्यासंदर्भात माहिती देताना सरपंच मापारी म्हणाले, घरात आर्थिक व्यवहारांचा वडिलांना अधिकार असतो, आईच्या हाती मात्र पैसा नसल्याने तिची नेहमीच कुचंबणा होते. आईलाही पैसा खर्च करण्याचा अधिकार असावा या भावनेतून गावातील सर्व नागरिक आपापल्या आईच्या नावाचे बँकेत खाते उघडून समाजासाठी वेगळा संदेश देणार आहेत.
वृद्घांना आधार देण्यासाठी गावातील सर्व वृद्घांना काठय़ांचे वाटप करण्यात येणार असून, गावातील निराधार महिलांना उपजीविकेसाठी तरतूद करण्यात येणार आहे. वर्षभरात जन्माला आलेल्या मुलींच्या नावावर ठराविक ठेव ठेवण्यात येऊन स्त्रीजन्माचे स्वागतही याच दिवशी करण्यात येणार आहे. सायंकाळी प्रा. प्रशांत मोरे व भरत दौंडकर यांच्या आईच्या कवितांचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचे समन्वयक दत्ता आवारी यांनी दिली.

Story img Loader