नवी मुंबई पालिकेच्या बेलापूर येथील नवीन, अद्ययावत, आलिशान अशा मुख्यालयात सध्या एका आईचा आपल्या मृत मुलीवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अनेक उच्च अधिकाऱ्यांच्या दालनात रडण्याचा हुंदका ऐकू येत आहे. प्रसूतीसाठी पालिकेच्या ऐरोली येथील माता बाल संगोपन केंद्रात दाखल झालेल्या मुलीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या डॉक्टरांवर कारवाई होत नसल्याने ही आई पालिकेच्या अनेक अधिकाऱ्यांच्या दालनाचे उंबरठे झिजवून थकली आहे. शेवटी न्याय नाही मिळाला तर मुख्यालयासमोर उपोषणाला बसण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असे ती सांगत आहे.
ऐरोली येथील पालिकेच्या रुग्णालयाचे बांधकाम गेली अनेक वर्षे सुरू आहे. त्यामुळे तेथे असलेले रुग्णालय व माता बाल केंद्र ठाणे बेलापूर मार्गावर रबाले येथील महाजन रुग्णालयाच्या आवारात स्थलांतरित करण्यात आले आहे. या पालिकेच्या माता बाल संगोपन केंद्रात २८ एप्रिल रोजी सुश्मिता परिच्छा नावाच्या एका ३२ वर्षीय महिलेला तिसऱ्या अपत्याच्या प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले. यापूर्वीच्या दोन प्रसूती नॉर्मल झाल्याने डॉक्टर आणि नर्स यांनी नॉर्मल प्रसूतीची रात्री उशिरापर्यंत वाट पाहिली. त्यानंतर सुश्मिताची प्रकृती बिघडत चालल्याने तिला पालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात हलविण्याची आवश्यकता होती. पण नॉर्मल प्रसूतीची वाट पाहत टाइमपास करणाऱ्या डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत वेळकाढूपणा केला. आता होईल, पाच मिनिटात होईल, दहा मिनिटात होईल अशी डॉक्टरांची उत्तरे होती.
डॉ. ममता रामटिके यांची वागणूक तर एका सावकारासारखी होती. मुलीच्या वेदना बघून तिची आई प्रतिमा बर्धन या तर डॉक्टरांना अनेक विनवण्या करीत होत्या, पण डॉक्टरांनी शेवटच्या क्षणी सव्वाचार वाजता सुश्मिताला हलविण्यास सांगितले. त्यावेळी रुग्णवाहिकेत सोबत एक डॉक्टरही देण्यात आला नाही. रबाले ते वाशी पाच किलोमीटरच्या प्रवासात असहाय्य वेदना झालेल्या सुश्मिताने कोपरखैरणे येथे शेवटचा हुंदका देऊन प्राण सोडला. डॉक्टरांनी वेळीच योग्य निर्णय न घेतल्याने सुश्मितेचा नाहक बळी गेला.
त्यानंतर सुश्मिताच्या आई व भावाने माहिती अधिकाराचा वापर करून सुश्मितावर केलेल्या औषधांची, त्यावेळी कामावर असलेल्या डॉक्टर, नर्स, कर्मचाऱ्यांची माहिती मिळवली. त्यात काही गौडबंगाल असल्याचे आढळून आले आहे. तेव्हापासून मुलीच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई व्हावी यासाठी सुश्मिताचे वडील, आई, भाऊ दोन दिवसाआड पालिकेच्या नवीन मुख्यालयातील आलिशान दालनात लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी बसणारे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय पत्तीवार, डॉ. प्रकाश निकम यांचे दरवाजे ठोठवत आहेत. मुलीच्या डोळ्यादेखत झालेल्या मृत्यूची कहाणी सांगताना आईला हुंदके अनावर होत आहेत, पण अधिकाऱ्यांना मात्र पाझर फुटलेला नाही. डॉ. निकम यांनी दिलेली वागणूक तर अतिशय वाईट असल्याची ही आई सांगते. आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांच्या कानापर्यंत या हुंदक्यांचे आवाज अद्याप पोहचलेले नाहीत असे दिसून येते. न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या आईने पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारातील घंटादेखील वाजवून पाहिली, पण पुढील बैठकीत अहवाल द्या या आश्वासनाव्यतिरिक्त त्यांना तेथून अद्याप न्याय मिळाला नाही. त्यामुळे एकुलत्या एका मुलीच्या विरहाने व्याकूळ झालेल्या आईच्या हुंदक्यांचा आवाज आजही आलिशान मुख्यालयातील दालनात घुमत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाचा कारभार सध्या रामभरोसे सुरू आहे. कोणाचा पायपोस कोणात नसलेल्या या विभागावर वरिष्ठांचे नियंत्रणच नसल्याने अशा घटना घडू लागल्याचे दिसून येते. 

Story img Loader