नेहरू मंडईचे बांधकाम महानगरपालिकेनेच करायचे, त्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांची समिती स्थापन करून त्यात नेहरू मंडई कृती समितीचा एक सदस्य घ्यायचा व निधीसाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव द्यायचा असे तीन निर्णय नेहरू मंडई पुर्ननिर्माण संबधीच्या विषयावर झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आले.
जिल्हा नियोजन समितीकडून निधी मागण्याच्या प्रस्तावासंबधाने भाजपचे शिवाजी लोंढे व राष्ट्रवादीचे विनित पाऊलबुद्धे यांच्यात जोरदार शाब्दिक वादावादी झाली. सत्ताधारी व विरोधी असे बहुसंख्य नगरसेवक मंडईचे बांधकाम मनपानेच करावे असे मत व्यक्त करत असताना राष्ट्रवादीचे माजी महापौर संग्राम जगताप यांनी मात्र मनपाने आतापर्यंत बांधलेल्या व्यापारी संकुलांची इतकेच काय पण मनपाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीची अवस्था पहा व नंतरच काय तो निर्णय घ्या असे सडेतोड मत मांडले. त्यापेक्षा खासगी निविदेला प्रतिसाद का येत नाही याचा विचार करा, विकासकांना विश्वासात घ्या, व खासगीकरणातूनच बांधकाम करा अशी सुचना जगताप यांनी केली.
मात्र बांधकाम मनपानेच करावे या बहुसंख्य नगरसेवकांच्या मागणीत त्यांची ही सुचना हरवून गेली. उपमहापौर गीतांजली काळे यांनी खासगीकरण किंवा मनपाकडून असे दोन्ही पर्याय सुचवून ते करताना मनपाच्या फायद्यासाठी काय काळजी घ्यावी त्याचे निवेदन वाचून दाखवले. बाळासाहेब बोराटे यांनी खासगीकरणात भुखंड गेला की मनपाला त्याकडे अनेक वर्षे फक्त बघत बसावे लागेल असे सांगून खासगीकरणाला विरोध केला. संजय चोपडा यांनी मोक्याची जागा आहे, फक्त बुकिंग सुरू केले तरी पैसे उभे राहतील असे मत व्यक्त करत मनपानेच बांधकाम करण्याचे समर्थन केले. निखिल वारे, संगीता खरमाळे, बाबासाहेब वाकळे यांनीही असेच मत व्यक्त केले.
संभाजी कदम यांनी या प्रकल्पाची प्रतिकृती तयार करून ती जाहीर करावी अशी मागणी केली. किशोर डागवाले, गणेश भोसले, सचिन पारखी आदींनी मनपानेच बांधकाम करण्याचे समर्थन केले. जिल्हा नियोजनकडून निधी मागण्याच्या विषयावर शिवाजी लोंढे यांनी प्रस्ताव पाठवू, ते निधी देणार नाहीत, पण त्यावरून त्यांची दानत तरी लक्षात येईल असे म्हणत या विषयात लक्ष घालणारे राष्ट्रवादीचे पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. त्यामुळे विरोधी पक्षनेते राष्ट्रवादीचे विनित पाऊलबुद्धे, माजी महापौर जगताप संतापले व त्यांनी लोंढे यांना धारेवर धरले. लोंढेही त्यांचा हिरीरीने प्रतिकार करत होते, मात्र त्यांच्या साथीला एकटे सचिन पारखी वगळता कोणीही नव्हते. तरीही त्यांनी खिंड लढवली. महापौर शीला शिंदे यांनीच मध्यस्थी करत हा वाद मिटवला.
सभागृह नेते अशोक बडे यांनी या चर्चेचा समारोप केला व नंतर महापौरांनी वरील निर्णय जाहीर केले. त्यानंतर नगरमध्ये विधी विद्यापीठ व्हावे, बेग पटांगणातील नियोजित टपऱ्यांसाठी घेतलेली अनामत रक्कम परत करणे, मुलामुलींच्या जन्मदराची माहिती मनपाला कायमस्वरूपी मिळणे, नागरी पाणी पुरवठा कार्यक्रम राबवणे हे विषय विनाचर्चाच मंजूर झाले.
प्रेक्षा गॅलरीत कृती समिती   
निर्णय होताना नेहरू मंडई कृती समितीचे अध्यक्ष वसंत लोढा, संजय झिंजे, उबेद शेख व अन्य सर्व सदस्य सभागृहाच्या प्रेक्षक गॅलरीत बसून होते व नगरसेवकांच्या भाषणाला टाळ्या वाजवून दाद देत होते. एखादा नगरसेवक चर्चेत भरकटू लागला की नेहरू मंडईचे बांधकाम झालेच पाहिजे अशा घोषणा देत ते त्याला मार्गावरही आणत होते. सर्वपक्षीय समितीत त्यांचा एक सदस्य घेण्यास विरोध होत होता मात्र नगरसेवक किशोर डागवाले, गणेश भोसले यांच्या आग्रहामुळे महापौर शीला शिंदे यांना ते अखेरीस मान्य करावे लागले. त्याही वेळी प्रेक्षक गॅलरीत जोरदार टाळ्या वाजल्या.

Story img Loader