वेगात असलेल्या दोन दुचाकींची समोरासमोर टक्कर होऊन एका पोलीस शिपायासह तिघे ठार झाले. वैशालीनगर सिमेंट मार्गावर सोमवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.
निलेश उर्फ गोलू विजय शेंडे (रा. बाबा बुद्धनगर) हा त्याचा मित्र प्रशांत जयगोपाल मेश्राम (रा. कुशीनगर) याच्यासह दुचाकीने (एमएच/४०/एच/१३१०) वैशालीनगर सिमेंट रस्त्याने मेहंदीबाग पुलाकडे वेगात जात होता. त्याचवेळी विरुद्ध दिशेने रितेश चंद्रशेखर पिल्ले (रा. बेलीशॉप क्वार्टर) हा वेगाने त्याच्या मोटारसायकलने (एमएच/३१/बीके/१३१०) येत होता.
एनआयटी चौकाजवळ दोन्ही वाहनांची भीषण टक्कर झाली. मोठा आवाज झाला. दोन्ही वाहने थोडी उसळून दूर फेकली गेली. दोन्ही वाहनांवरील तिघे वाहनांबरोबर वर उसळून रस्त्यावर जोरात आपटले. यावेळी रस्त्यावर थोडीफार वर्दळ होती. वाहने आदळल्याच्या आवाजाने लोक दचकले. अपघात झाल्याचे दिसताच लोक धावले.
अपघात झाल्याचे समजल्यानंतर पाचपावली पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी विदारक दृश्य होते. दोन्ही दुचाकी चेपल्या होत्या. तिघांच्याही डोक्यातून भरपूर रक्तस्राव सुरू होता. तिन्ही गंभीर जखमींना तातडीने मेयो रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान रात्री त्यांचा मृत्यू झाला.
पाचपावली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. रितेश पिल्ले हा रेल्वे पोलीस दलात शिपाई होता. इतवारी रेल्वे स्थानकावर त्याची डय़ुटी होती. काल रात्री तेथून तो बेलिशॉप क्वार्टरमधील घरी परत जात होता. रितेश २००६ मध्ये पोलीस दलात दाखल झाला.
त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, १ मुलगा व १ मुलगी आहे. अपघात घडल्याचे समजल्यानंतर तिघांच्याही कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली. तिघांच्याही मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना शोकावेग आवरत नव्हता.

Story img Loader