उमलत्या वयातील कुमारांवर कोसळलेल्या दैवाच्या घाल्यामुळे करवीर तालुक्यातील सांगवडे गावावर शनिवारी शोककळा पसरली. तुळजापूरला सहलीसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांच्या मिनिबसला समोरून येणाऱ्या लक्झरी बसने जोरदार धडक दिल्याने ८ विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला. तर आठ विद्यार्थी जखमी झाले. या घटनेने सांगवडे गावातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. अपघाताचे वृत्त कळले तरी त्यात नेमका कोणाचा मृत्यू झाला आणि कोण जखमी झाले याची स्पष्ट कल्पना न आल्याने सहलीला गेलेल्या प्रत्येक कुटुंबातील सदस्याची दिवसभर घालमेल सुरू होती. एकमेकांना आधार देत कसातरी वेळ काढला जात होता.
पाच हजार लोकसंख्येच्या सांगवडे गावात सांगवडे माध्यमिक विद्यालय आहे. आठवी ते दहावीपर्यंतचे वर्ग येथे भरतात. गतवर्षी दहावीचा १०० टक्के निकाल लागला होता. शाळेत सुमारे १२० विद्यार्थी शिकतात. शाळेतील तीन शिक्षकांसह ५८ विद्यार्थी-विद्यार्थिनी शुक्रवारी सकाळी सहलीसाठी निघाले होते. एका गाडीत विद्यार्थी तर दुसऱ्या गाडीत विद्यार्थिनींना बसविण्यात आले होते. काल पंढरपूरचे दर्शन घेऊन त्यांनी सोलापुरात मुक्काम केला होता. सकाळी ६ वाजता ते तुळजापूरला जाण्यासाठी बाहेर पडले. अध्र्या तासाचे अंतर पार केले असतांना साडेसहा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. अपघाताची माहिती एका शिक्षकाने गावात दिल्यावर क्षणार्धातच ही माहिती गावभर पसरली. दिवस उगवत असतानाच अवघे आबालवृध्द ग्रामपंचायतीसमोर जमले.
सकाळपासूनच गावावर शोककळा पसरली होती. अवघे वातावरण उदास बनले होते. दुकाने, रिक्षा, बस असे सर्वच व्यवहार थंडावले होते. सहलीला गेलेल्यांपैकी नेमके कोण अपघातग्रस्त झाले आहेत, याची स्पष्ट कल्पना कोणालाही नव्हती. एकमेकांकडून अंदाज घेण्याचा प्रयत्न केला जात होता. ज्यांना अपघाताची माहिती होती त्यांनी नातेवाईकांना कल्पना न देता धीर देण्याचे काम करीत होते. दहा वाजल्यानंतर अनेक जणांनी मिळेल त्या वाहनातून अपघातस्थळाकडे जाण्यास सुरुवात केली. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगवडेत जाऊन जखमींसाठी वैद्यकीय मदत पुरविली. विद्यार्थ्यांचे मृतदेह व जखमींना गावात आणण्यासाठी खास वाहनांची व्यवस्था त्यांनी केली होती. गावात पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. दिवस मावळला तरी सांगवडेकरांच्या चेहऱ्यावरील अस्वस्थता कायम होती. अपघातातील मृत विद्यार्थ्यांच्या नावाचा तपशील कळू लागला तसा त्या कुटुंबीयांच्या घरासमोर आक्रोश सुरू होता. गावात रडण्याचे हुंदके ऐकू येत होते.
सांगवडेमध्ये एकच माध्यमिक विद्यालय असल्याने सर्वच स्तरातील विद्यार्थी येथे शिकतात.गरिबांच्या पालकांनी पदरमोड करून पाल्यांना सहलीला पाठविले होते. आकाश शिर्के याचे वडील मजूर आहेत. त्यांनी मुलाच्या सहलीसाठी घरातील घागरी विकून पैसे जमविले होते. सूतगिरणीचे कामगार असलेल्या महादेव कुंभार यांचा अपघातात मृत झालेला पंकज हा एकुलता एक मुलगा होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा