कोणाचाही दबाव न घेता निर्णय घेणारे अधिकारी म्हणून परिचित असलेले अतिरिक्त जिल्हाधिकारी अप्पासाहेब धुळाज यांची नागपूर येथे तातडीने बदली झाल्याने बदलीविरोधात सेवाभावी संघटना, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्ष यांच्यातून आवाज उमटू लागला आहे. धुळाज यांच्या तडकाफडकी बदलीच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. त्यांना नगरसेवक संघटना, बजरंग दल यांनीही पाठबळ दिले.
धुळाज यांनी आपल्या बेधडक कार्यशैलीने महसूल विभागाला प्रतिष्ठा मिळवून दिली होती. या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली झाल्याने विविध स्तरांतून निराशाजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. ही बदली भूखंडमाफियांनी केल्याचा आरोप करीत आम आदमी पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. लोकसभा निवडणुकीपूर्वी बदली केल्याचे प्रशासनाचे म्हणणे असले तरी नेमकी धुळाज यांची बदली का झाली असा सवाल या पक्षाने निवेदनात उपस्थित केला आहे. पालकमंत्र्यांच्या राजकीय दबावातून बदली झाल्याचा आरोप पक्षाचे जिल्हा समन्वयक नारायण पवार यांनी केला आहे. धुळाज यांनी शहरातील अनेक गैरव्यवहार, अनधिकृत बांधकामांना चाप लावला. चुकीच्या पद्धतीने खिरापतीप्रमाणे वाटलेल्या शासकीय जमिनी त्यांनी पद्धतशीरपणे पुन्हा प्रशासनाला मिळवून दिल्या आहेत. कळंबा, गांधीनगरसारख्या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे बंद पाडली तेच बदलीचे कारण असल्याचे नमूद करून त्यांची बदली रद्द करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्याकडे करण्यात आली. आंदोलनात पद्माकर कापसे, नाथाजी पोवार, नीलेश रेडेकर, संदीप देसाई, उत्तम पाटील, वैशाली कदम, पूनम माने आदी सहभागी झाले होते.
धुळाज यांच्या बदलीमागे झारीतील शुक्राचार्य कोण हे जाहीर करावे, अशी मागणी प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेने उपस्थित केला आहे. भूखंडमाफिया, त्यांना सामील असलेले अधिकारी, विभागीय आयुक्त आणि लोकप्रतिनिधी यांची मिलिभगत होऊन त्यांनीच भ्रष्ट कारभाराला आडवे येणारे धुळाज यांची जाणीवपूर्वक बदली केली असल्याचे संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई, बुऱ्हान नायकवडी यांनी पत्रकात म्हटले आहे. दरम्यान, जिल्हय़ातील गडहिंग्लज तालुक्यातील धुळाज रहिवासी असल्याने आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर त्यांची बदली नियमानुसार केली असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. तथापि हा मुद्दा ग्राहय़ धरला तरी भूखंडमाफियांना धडा शिकविण्यासाठी निवडणुका संपल्यानंतर धुळाज यांना पुन्हा कोल्हापूरमध्ये आणणार का, असा प्रश्न नारायण पोवार यांनी आज जिल्हाधिका-यांशी झालेल्या चर्चेवेळी केला. पण जिल्हाधिका-यांनी तुमच्या भावना शासनाला कळवू असे म्हणत उत्तर देण्याचे टाळले.
अतिरिक्त जिल्हाधिका-यांच्या बदलीविरोधात कोल्हापुरात आंदोलन
कोणाचाही दबाव न घेता निर्णय घेणारे अधिकारी म्हणून परिचित असलेले अतिरिक्त जिल्हाधिकारी अप्पासाहेब धुळाज यांची नागपूर येथे तातडीने बदली झाल्याने बदलीविरोधात सेवाभावी संघटना, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्ष यांच्यातून आवाज उमटू लागला आहे.
First published on: 24-01-2014 at 03:30 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Movement against transfer of additional collector in kolhapur