डॉ. अशोक चोपडे हे सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. सत्यशोधक व ब्राह्मणेतर चळवळींचे संशोधन ते निष्ठापूर्वक करीत आहेत. वैचारिक प्रबोधनासाठी ते सातत्याने लेखन, संशोधन करीत आहेत. ‘विदर्भातील सत्यशोधक चळवळीचे साहित्य’ हा त्यांचा ग्रंथ विदर्भाच्या इतिहासाच्या संशोधनातील फार महत्त्वाचे दालन होय. विदर्भाचे सांस्कृतिक, सामाजिक पर्यावरण समजून घ्यायचे असेल तर या ग्रंथाशिवाय पुढे जाता येत नाही.
या ग्रंथात सहा प्रकरणे आहेत आणि चार परिशिष्टय़े आहेत. ‘सत्यशोधक चळवळीची पाश्र्वभूमी’ कथन करणाऱ्या पहिल्या प्रकरणात सत्यशोधक समाजाच्या स्थापनेच्या काळात व तत्पूर्वी महाराष्ट्राची सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती कशी होती, त्याचे विश्लेषण केले आहे. महाराष्ट्रासह विदर्भातील सामाजिक, धार्मिक परिस्थिती कशी रुढीबद्ध आणि मानसिक गुलामगिरीचे पाश आवळणारी होती, त्याचे विवेचन येथे केले आहे. महात्मा जोतीराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केल्यानंतर महाराष्ट्रात प्रबोधनाचे नवे पर्व सुरू झाले. विदर्भात सत्यशोधक समाजाचे कार्य सुरू झाले. विदर्भातील सत्यशोधक समाजाच्या प्रचार-प्रसार कार्याची सखोल चिकित्सा या प्रकरणात केली आहे.
‘विदर्भातील सत्यशोधक कार्यकर्त्यांची साहित्यनिर्मिती’ या प्रकरणाच्या पहिल्या भागात ग्रंथनिर्मितीचा आढावा घेतला आहे. ताराबाई शिंदे, शास्त्री नारो बाबाजी, महाघट पाटील पानसरे, कृष्णराव भालेकर, मोतीराम तुकाराम वानखेडे, कृष्णराव चौधरी, अमृतराव कृष्णाजी चौधरी, काशिरावबापू चौधरी, बळीराम श्रावण मालपे, श्यामराव सीताराम कुलट, गोविंद नारायण फुटाणे, देविदास सदाशिव पाटील, पुंजाजी रामजी गोटे, पंढरीनाथ सीताराम पाटील, डॉ. कृष्णमूर्ती पोटफोडे, दलपतसिंग चव्हाण, बी.एच. बेलसरे, के.एस. धनुस्कर, गोपाळराव काशीराव देशमुख, वामनराव चोरघडे, दिनकरराव जवळकर, पुरुषोत्तम देशमुख, श्री.पुं. पिंपळे, आ.अ. मानकर, बाबुराव भोसले, पां.ल. शहाकार, गोपाळराव, बाबुराव देशमुख, राणा खुशालराव सूर्यभान पाटील, एकनाथराव चौधरी, यादवराव श्यामराव गुंड, श्यामराव राघव वंदे, गो.दा. दळवी, नीळकंठ विठ्ठलराव शिंगणे, खुशालराव यावले, बोंद्राजी राणोजी घुरडे, अ.भि. क्षीरसागर, नारायण बालाजी पाटील, नित्यानंद विठोजी मोहिते, बाबुराव भोसले, डॉ. पंजाबराव देशमुख, गणपती ऊर्फ हरी महाराज, यायनाथ इंगळे, प्रा. हि.ए. चव्हाण, वीर उत्तमराव मोहिते, डॉ. इंद्रभूषण भिंगारे, कृष्ण गुलाब देशमुख, आत्माराम मुकुंद महाजन, यशवंत देशमुख, शिवराम पांडुसा जयस्वाल, बी.व्ही. प्रधान यांच्यासह अनेकांनी लिहिलेल्या, काही संपादित केलेल्या ग्रंथसंपदेचे विवेचन येथे केले आहे. लेखकाचे नाव नाही अथवा टोपणनावाने लेखन केले आहे, अशा ग्रंथांच्या नोंदीही येथे आहेत.
या प्रकरणाच्या दुसऱ्या भागात सत्यशोधक ब्राह्मणेतर शेतकरी आणि जातीय परिषदांमधील लिखित भाषणे, अहवाल व पत्रव्यवहार आदींचा आढावा घेतला आहे. वैचारिक ग्रंथ, कथा, कादंबरी, चरित्र, वैचारिक भूमिका विशद करणाऱ्या छोटय़ा पुस्तिका, पत्रके, वर्तमानपत्रे, पत्रव्यवहार, असे साहित्य विदर्भातील सत्यशोधक चळवळीच्या प्रबोधन कार्याचा लेखाजोखा मांडणारे आहे.
‘विदर्भातील सत्यशोधक कार्यकर्त्यांनी केलेले कार्य: प्रचार आणि प्रसार’ हे तिसरे प्रकरण होय. सत्यशोधक चळवळीच्या प्रचार-प्रसारासाठी कार्यकर्त्यांनी उपयोगात आणलेल्या साधनांचा आणि माध्यमांच्या स्वरूपाची सांगोपांग चर्चा या प्रकरणात केली आहे. पत्रके, पत्रव्यवहार, जलसा यांच्यासह परिषदा, प्रयोग, उपक्रम, वर्तमानपत्रे, मासिके, ग्रंथमाला आदी साधने व माध्यमे कशी होती, त्यांचे उपयोजन कसे केले गेले, कार्यकर्ते, लेखक, कवी, शाहीर कलावंतांनी सत्यशोधक आचार विचारांचा प्रचार-प्रसार कसा केला, समाजाला प्रबोधनाचा विचार कसा दिला, त्याचे अनुकूल परिणाम कसे झाले, त्याची सविस्तर चिकित्सा येथे केली आहे.
‘सत्यशोधक चळवळीच्या साहित्याची तोंडओळख’ या चौथ्या प्रकरणात या चळवळीच्या साहित्याने समाजाला मानवतेचा, समतेचा, बंधुभावाचा संदेश देत, अंधश्रद्धा, भोंदूगिरी, अमानुषता, धार्मिक थोतांड यापासून कसे दूर ठेवले, त्याची मीमांसा केली आहे. सत्यशोधक चळवळीच्या साहित्याने समाजाला विचाराभिमुख आणि कृतिशील केले.
पाचव्या प्रकरणात ‘सत्यशोधक चळवळीतील साहित्याची समीक्षा’ केली आहे. सत्यशोधक चळवळीतील वैचारिक साहित्य-निबंध, पुस्तके, लेख, कथा-कादंबरी, नाटके, काव्य, चरित्र, भाषणे, पत्रके, पत्रव्यवहार, अहवाल, घटना, जाहीरनामा वगैरे साहित्याची समीक्षा केली आहे. तत्कालीन सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक पर्यावरण, साहित्य निर्मिती यांच्या पाश्र्वभूमीवर आशयसूत्रे, वाङ्मयीन व भाषिक वैशिष्टय़े, प्रभाव व परिणाम याविषयीची चर्चा, चिकित्सा आणि साहित्यकृतींविषयीच्या वादांची मीमांसा या प्रकरणात केली आहे.
‘सत्यशोधक चळवळीतील साहित्याचे मराठी वाङ्मयामध्ये योगदान’ या सहाव्या प्रकरणात या चळवळीच्या साहित्याने मराठी साहित्याला काय दिले, याची चिकित्सा आहे. सत्यशोधक साहित्याचे वैचारिक आणि भाषिक योगदान फार मोठे आहे, तसेच सत्यशोधक चळवळीतील साहित्याचा समाजमनावर व जीवनावर झालेला परिणाम व त्याचा प्रभाव याचीही चिकित्सा येथे केली आहे. परंपराधिष्ठित मराठी साहित्याला ज्ञात नसलेले व त्या साहित्याने अलक्षित ठेवलेले सर्व विषय, भाषा, परिसर सत्यशोधक साहित्याने स्वीकारले आणि नवे साहित्यिक, सांस्कृतिक पर्यावरण घडवले. सत्यशोधक चळवळीच्या या साहित्याने एकूणच मराठी साहित्याचे नावलौकिक जागतिक पातळीवर कसे नेले, त्याची साधार मीमांसा या प्रकरणात केली आहे.
या ग्रंथाच्या शेवटी पाच परिशिष्टय़े आहेत. अमरावती येथील दुसऱ्या ब्राह्मणेतर काँग्रेसच्या परिषदांमधील छायाचित्रे, वर्तमानपत्रे व परिषदांची पत्रके, कार्यकर्त्यांची दुर्मिळ छायाचित्रे या परिशिष्टांनी ग्रंथाचे संदर्भ वैभव वाढवले आहे.
‘विदर्भातील सत्यशोधक चळवळीचे साहित्य’ हा डॉ. अशोक चोपडे यांचा ग्रंथ चळवळ आणि साहित्याच्या अभ्यासासाठी संदर्भग्रंथ म्हणून फार उपयुक्त आहे. साहित्याच्या निर्मिती प्रेरणांसह आशयसूत्रांचे अनुबंध सामाजिक, सांस्कृतिक, आíथक, धार्मिक, राजकीय पर्यावरणाशी जुळलेले असतात म्हणून चळवळीच्या साहित्याचा इतिहास हा एकप्रकारे समाजजीवनाचाही इतिहास असतो, हे भान हा ग्रंथ देतो. विविध चळवळीत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांसह ग्रंथालयांनीही हा ग्रंथ संग्रही ठेवावा. चळवळीचा अभ्यास करणाऱ्या नव्या अभ्यासकांना हा ग्रंथ उपयुक्त ठरणारा आहे.
विदर्भातील सत्यशोधक चळवळीचे साहित्य -डॉ. अशोक चोपडे, कॅन्डीड प्रकाशन, वर्धा
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा