भरमसाठ वीज व पाणीदरवाढ व इतर जिव्हाळ्याच्या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या १३ ते १८ डिसेंबर या कालावधीत सोलापुरात तसेच नागपूर येथे राज्य विधिमंडळ अधिवेशनात औद्योगिक संघटना समन्वय समितीच्या वतीने घंटानाद व घेराव आंदोलन करण्यात येणार आहे. संघटनेचे समन्वक तथा ज्येष्ठ उद्योजक शरदकृष्ण ठाकरे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.
या आंदोलनात सोलापूर शहर व जिल्ह्य़ातील शेकडो उद्योजक सहभागी होणार आहेत. यात सोलापुरातील होटगी रोडवरील सहकारी औद्योगिक वसाहतीसह अक्कलकोट एमआयडीसी, चिंचोळी एमआयडीसी येथील उद्योजक तथा कारखानदारांचा समावेश राहणार आहे.
या संदर्भात आंदोलनाची भूमिका स्पष्ट करताना ठाकरे यांनी सांगितले की, अलीकडे सातत्याने होत असलेल्या इंधनदरवाढीमुळे मालवाहतूक महागली आहे. आता विजेचा दर युनिटमागे तीन रुपयांनी वाढला आहे. तर पाण्याच्या दरातही भरमसाठ म्हणजे ३० टक्क्य़ांनी वाढ झाली आहे. त्यामुळे उद्योगक्षेत्र संकटात आहे. मुळातच जगात महामंदीचे वातावरण असताना त्यात भारतात व महाराष्ट्रात औद्योगिक क्षेत्रात अनेक संकटे कायम आहेत. परवानाराजसह करप्रणाली व अन्य बाबींचा गांभीर्याने विचार करता गेल्या काही महिन्यांपासून उद्योगधंदे गंभीर स्थितीतून मार्गक्रमण करीत आहेत. उद्योजक अडचणीत असताना त्याकडे लक्ष वेधूनदेखील शासनाचे दुर्लक्ष कायम आहे. त्यामुळे आता आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागत असल्याचे ठाकरे यांनी नमूद केले.
राज्य विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात १८ डिसेंबर रोजी राज्यातील सर्व औद्योगिक संघटनांचे लाक्षणिक धरणे आंदोलन होणार आहे. तत्पूर्वी, १३ डिसेंबर रोजी राज्यात सर्व महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर एकाचवेळी घंटानाद केला जाणार आहे, तर १५ व १६ डिसेंबर रोजी औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी स्थानिक आमदार, खासदार व मंत्र्यांना स्थानिक पातळीवर घेराव घालणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस हरिभाऊ गोडबोले, मकरंद गवळी, वासुदेव बंग, अतुल बक्षी, कमलेश शहा, केतन शहा, किसन दांडगे आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा