प्री-फॅब्रिकेटेड अंगणवाडीच्या विषयावरून जिल्हा परिषदेत राजकारण पेटू लागले आहे. या विषयावरून जि.प. अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांना अडचणीत आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्याच सदस्यांनी आता हालचाली सुरू केल्या आहेत. या अंगणवाडय़ा उभारणीस लंघे यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतरही, त्यांच्याच नेवासे तालुक्यातील पक्षाचे सदस्य तुकाराम शेंडे यांनी त्यास विरोधाचे पत्र लंघे यांना दिले आहे.
राज्य सरकारकडून खास प्रयत्न करून मंजूर करून आणलेल्या या तब्बल २१ कोटी रुपये खर्चाच्या ४९८ प्री-फॅब्रिकेटेड अंगणवाडय़ा उभारण्याच्या लंघे यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास काँग्रेसच्या सदस्यांनी विरोध केला. त्यासाठी अंगणवाडय़ांच्या दर्जाचा मुद्दा उपस्थित केला. त्याला सत्तेतच सहभागी असलेल्या भाजप व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी साथ दिली. त्यामुळे या अंगणवाडय़ांचे समर्थन करण्याची भूमिका सुरुवातीला राष्ट्रवादीच्या सदस्यांनी घेतली. प्रकल्प रेंगाळल्यास १६ कोटी रुपयांचा निधी अखर्चित राहणार, हा यातील कळीचा मुद्द ठरला आहे. यापूर्वीच गेल्या चार वर्षांत डीपीसीने जि. प.ला दिलेला सुमारे ४२ कोटी रुपयांचा निधी अखर्चित राहिल्याने वादंग निर्माण झाले होते.
हा वाद आणखी पेटू नये यासाठी लंघे यांनी स्वत:च्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय चौकशी समिती नेमली व चौकशी होईपर्यंत या अंगणवाडय़ा उभारणीस स्थगिती दिली. परंतु समितीने जेव्हा प्री-फॅब्रिकेटेड अंगणवाडय़ांची पाहणी करण्यासाठी दौरा आखला, त्याच वेळी समितीमधील राष्ट्रवादीचे सदस्य गैरहजर राहिले. परंतु लंघे यांनी तरीही त्यांच्या उभारणीस हिरवा कंदील दिला. खरेतर त्याच वेळी हा विषय संपला असेच सर्व सदस्य मानत होते.
परंतु राष्ट्रवादीच्याच व लंघे यांच्याच तालुक्यातील सदस्य असलेल्या तुकाराम शेंडे यांनी पुन्हा दर्जाचा मुद्दा उपस्थित करत त्यांच्या खरवंडी गटातील माळीचिंचोरा, म्हाळसपिंपळगाव, वडाळा बहिरोबा व खरवंडी या चार ठिकाणी प्री-फॅब्रिकेटेड अंगणवाडय़ा उभारणीस विरोध असल्याचे पत्र शुक्रवारी प्रशासन व अध्यक्षांच्या कार्यालयास दिले. त्यामुळे राष्ट्रवादीचे आणखी काही सदस्य विरोधाचे पत्र देण्याच्या पवित्र्यात असल्याचे समजले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा