सोलापूर जिल्हय़ाप्रमाणे शहरातही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी वाढली असून, त्यातूनच महापालिका राष्ट्रवादीचे गटनेते दिलीप कोल्हे यांच्या विरोधात नाराजी वाढल्यामुळे गटनेता बदलण्याच्या मागणीला जोर चढला आहे. दरम्यान, १२ नगरसेवकांच्या मागणीनुसार येत्या मंगळवारी, २८ मे रोजी मुंबईत पक्षश्रेष्ठींनी सर्व नगरसेवकांना पाचारण केले आहे. या बैठकीत मुंबईत गटनेता बदलला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शहरात राष्ट्रवादी एकसंघ नसल्याचे अंतर्गत गटबाजीतून दिसून येते. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नावाचा वापर केला जातो. प्रत्यक्षात एखादाच खरा पवारनिष्ठ असून कोणी ‘पवार इज पॉवर’ म्हणत असले तरी त्याची निम्मी ‘मनोहारी’ निष्ठा काँग्रेसचे नेते केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर आहे. तर काहीजण महापालिकेची सूत्रे सांभाळणारे काँग्रेसचे स्थानिक नेते विष्णुपंत कोठे यांच्याशी संधान बांधून आहेत. काहीजण माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यावर प्रेम करतात. किंबहुना शहरात राष्ट्रवादी काँग्रेस सुशीलकुमार व कोठे हेच चालवितात की काय, अशी शंका उपस्थित होत आहे. पक्षांतर्गत लाथाळय़ा वरचेवर वाढल्या आहेत. त्यामुळे पक्षाची वाटचाल कठीण स्थितीतून होत आहे.
या पाश्र्वभूमीवर महापलिका राष्ट्रवादी गटनेते दिलीप कोल्हे हे महापालिकेच्या राजकारणात कोठे गटाच्या मर्जीने वाटचाल करीत असल्याचे बोलले जाते. गटनेतेपदावर माजी महापौर मनोहर सपाटे हे दावेदार असताना ते कोठे यांचे कट्टर विरोधक असल्याने त्यांना गटनेतेपदावर आरूढ होता आले नाही. तर सपाटे यांचे सहकारी माजी उपमहापौर पद्माकर काळे यांचे नाव यंदा पालिका स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी निश्चित झाले असताना केवळ कोठे यांना काळे हे नको होते. त्यामुळेच राष्ट्रवादीअंतर्गत चक्रे फिरली आणि ऐनवेळी इब्राहिम कुरेशी यांच्या गळय़ात सभापतिपदाची माळ पडली. सद्य:स्थितीत पक्षातील धुसफूस कायम राहिल्याने गटनेते बदलाची मागणी जोर धरत आहे. कोल्हे यांना बदलून प्रवीण डोंगरे यांना गटनेतेपद देण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात १६ पैकी १२ नगरसेवकांनी पक्षश्रेष्ठींना पत्र दिले असून, त्यानुसार येत्या मंगळवारी मुंबईत राष्ट्रवादी भवनात प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड व सोलापूरचे पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या उपस्थितीत बैठक होऊन निर्णय घेतला जाणार असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.

Story img Loader