धंतोली झोनच्या सभापतीपदी सुमित्रा जाधव यांनी पदभार स्वीकारताच त्यांना पाणी समस्येवरून त्रस्त महिलांच्या कोषाला सामोरे जावे लागले. पक्षातील काही महिला पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात संतप्त महिलांनी जाधव यांच्या रामेश्वरीतील निवासस्थानापुढे मटका फोड आणि रस्तारोको करून निषेध केला. महिलांचे आंदोलन करणाऱ्यांमध्ये भाजपच्या पदाधिकारी असल्याची माहिती मिळाली. यावेळी जाधव आणि पदाधिकारी यांची शाब्दिक चकमक उडाली.
रामेश्वरी प्रभागातंर्गत असलेल्या कुंजीलालपेठ, परदेशी मोहल्ला परिसरातील काही भागात गेल्या अनेक दिवसांपासून पाणी समस्या असून लोक त्रस्त झाले आहेत. या संदर्भात परिसरातील नागरिकांनी जाधव यांना निवेदन दिले होते. ओसीडब्ल्यूकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या मात्र परिसरात येऊन समस्येची पाहणी करण्याचा आग्रह महिलांनी केला होता मात्र व्यस्त कार्यक्रमामुळे जाणे शक्य नाही. महापौर अनिल सोले यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमामुळे जाधव यांना जाणे शक्य झाले नाही. त्यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त करीत जाधव यांच्या घरासमोर धडक दिली. यावेळी महिलांनी सोबत आणलेले मडके त्यांच्या घरासमोर फोडले. त्यावेळी जाधव आणि आंदोलक महिला यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यात भाजपच्या पदाधिकारी होत्या हे विशेष. वादानंतर महिलांनी घरापुढे ठाण मांडून रस्ता रोको आंदोलन केले आणि वाहतूक रोखून धरली. पाणी समस्या तातडीने सोडविण्याच्या ठोस आश्वासनानंतर परिस्थती निवळली. आंदोलनानंतर लगेच ३ टँकर परिसरात पाठविण्यात आले. पाणी समस्येचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत पदाधिकारी येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा