१५ मे रोजी होणाऱ्या महापौर-उपमहापौर निवडीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसअंतर्गत हालचाली गतिमान झाल्या आहेत. दोन्ही पक्षांतील नेत्यांनी सोमवारी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. सर्वसाधारण महिला गटासाठी महापौरपद आरक्षित असून त्यासाठी काँग्रेस पक्षाकडून पाच नगरसेविकांनी आज इच्छा व्यक्त केली. राष्ट्रवादीकडून उपमहापौर सचिन खेडकर हे पुनश्च इच्छुक असून त्यांच्यासह अन्य उमेदवारांनी आज मुलाखती दिल्या.     
महापालिका निवडणुकीनंतरचा पहिला अडीच वर्षांचा कालावधी संपत आला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीत झालेल्या समझोत्यानुसार पहिल्या वर्षी वंदना बुचडे, पुढच्या वर्षी राष्ट्रवादीच्या कादंबरी कवाळे या महापौर झाल्या. तर उर्वरित सहा महिन्यांसाठी सध्या काँग्रेसच्या जयश्री सोनवणे महापौरपद भूषवत आहेत. उर्वरित अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण महिलापदासाठी आरक्षण आहे. त्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांतर्गत हालचालींना गती आली आहे.     
जिल्हा काँग्रेस भवनमध्ये सोमवारी इच्छुक नगरसेविकांच्या मुलाखती पार पडल्या. गृहराज्यमंत्री सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, सभागृह नेता श्रीकांत बनछोडे यांनी मुलाखती घेतल्या. मीना सूर्यवंशी, वैशाली डकरे, प्रतिभा नाईकनवरे, लीला धुमाळ व दीपाली डोणुक्षे यांनी महापौरपदासाठी इच्छा प्रदर्शित केली.    
राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मुलाखतींचा सिलसिला सुरू राहिला. कामगारमंत्री हसन मुश्रीफ, शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी मुलाखती घेतल्या. विद्यमान उपमहापौर सचिन खेडकर, मधुकर रामाणे यांच्यासह अन्य काही सदस्यांनी मुलाखती दिल्या. काँग्रेस पक्षाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त करीत प्रसंगी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा इरादा व्यक्त केला.