संगमनेरच्या कवी अनंत फंदी यांचे नाव राज्यभरातील साहित्यिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम येथील पुरस्कार सोहळ्यातून होते. इतिहास संशोधन मंडळाने सुरू केलेली विचारांची ही चळवळ यापुढे अधिक व्यापक व्हायला हवी, अशी अपेक्षा आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केली.
संगमनेर इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने कवी अनंत फंदी साहित्य व कलागौरव पुरस्काराचे वितरण आमदार तांबे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. शिवराम बिडवे (कलागौरव पुरस्कार), आरती दातार (शून्यातून सूर्याकडे, गद्यविभाग), प्रा. शंकरराव दिघे (या शतकाचा सातबाराच होईल कोरा, पद्य विभाग), डॉ. सागर देशपांडे (बेलभंडारा, चरित्र), अजय कांडर (हत्तीइलो, दीर्घकाव्य), काका विधाते (संताजी, कादंबरी), सोपान खुडे (लावणी गंध आणि रूप, माहितीपर साहित्य) या सर्वांचा साहित्य गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. व्यासपीठावर बहुजन शिक्षण संस्थेचे सचिव प्रेमानंद रूपवते, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, मंडळाचे अध्यक्ष द्वारकानाथ राठी, कार्याध्यक्ष संतोष खेडलेकर व पुरस्कारप्राप्त साहित्यिक या वेळी उपस्थित होते.
आमदार तांबे म्हणाले, साहित्यातून समाजाचे प्रतिबिंब दिसते असे नव्हेतर त्यातून आपल्या समाजाचे जीवनदेखील समृद्ध करणारे ठरते. निकोप समाज घडविण्यासाठी चांगल्या साहित्याची नितांत गरज आहे. पुरस्काराच्या माध्यमातून नवनवीन साहित्यिकांना प्रेरणा मिळते. अडीचशे वर्षांपूर्वी कवी अनंत फंदींनी लिहिलेल्या साहित्यातून आजच्या समाजाची दशा प्रतिबिंबित होते हे त्याचेच द्योतक आहे.
रूपवते म्हणाले, जेव्हा जेव्हा अंधाराच्या पलीकडे एखादा किरण दिसतो तेव्हा त्यामागे निश्चितच साहित्याची प्रेरणा असते. नि:स्वार्थी मित्र आणि मैत्रीचा उगम साहित्यातूनच होत असतो. जगाच्या इतिहासात आजपर्यंत लागलेल्या शोधात साहित्याचाच वाटा मोठा आहे.
मंडळाचे अध्यक्ष द्वारकानाथ राठी, पुरस्कार विजेत्या आरती दातार व शिवराम बिडवे यांनी मनोगत व्यक्त केले. राठी यांचे अमृतमहोत्सवी वर्षामुळे अभीष्टचिंतन करण्यात आले. प्रकल्पप्रमुख सुनील सराफ यांनी प्रास्ताविक केले. संतोष खेडलेकर यांनी सूत्रसंचालन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा