विदर्भ राज्य निर्मितीचा ठराव पारित करून केंद्र शासनाकडे पाठवावा, या मागणीसाठी संयुक्त विदर्भ कृती समितीतर्फे आज विधिमंडळ परिसरात धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले.
 या धरणे आंदोलनात आमदार डॉ. अनिल बोंडे, माजी आमदार वामनराव चटप, माजी आमदार सरोज काशीकर, माजी आमदार भोला बढेल, माजी आमदार रमेश गजभे, माजी आमदार उपेंद्र शेंडे, शेतकरी संघटनेचे निमंत्रक राम नेवले, अहमद कादर सहभागी झाले होते.
डॉ. बोंडे म्हणाले, विदर्भातील नागरिकांनी वेगळ्या विदर्भ राज्याची घोषणा केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तेलंगणाबरोबरच स्वतंत्र विदर्भ  राज्याचा प्रस्ताव पारित करावा. यावेळी कृती समितीने विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, उद्योगमंत्री नारायण राणे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मनसेचे गट नेते बाळा नांदगावकर यांना निवेदन दिले. अशोक चव्हाण यांनी मी संयुक्त महाराष्ट्रवादी आहे. परंतु तुमच्या भावना शासनापर्यंत पोहचविणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
मराठवाडय़ातील समस्यांवर दोन्ही सभागृहात चर्चा व्हावी, या प्रमुख मागणीसाठी विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापतींची मराठवाडय़ातील सर्वपक्षीय सदस्यांनी भेट घेऊन निवेदन दिल्याची माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. जायकवाडी प्रकल्पाचे पाणी समन्यायी पद्धतीने वाटप झाले पाहिजे. त्यासाठी चर्चा झाली पाहिजे. चर्चेतून हा प्रश्न सुटला तर न्यायालयात जाण्याची गरज भासणार नाही. दोन्ही सभागृहात मराठवाडय़ातील जायकवाडी प्रकल्पांसोबतच अन्य महत्त्वांच्या प्रश्नांवर चर्चा होईल, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला. चार राज्यात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, सर्वच राज्यात सारखी परिस्थिती नसते.
-क्षणचित्रे-
 ‘आम्ही टोल देणार नाही’: कोल्हापूर येथील टोल नाका हटवा, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील आमदारांनी विधिमंडळ परिसरात घोषणा दिल्या. ‘टोल आम्ही देणार नाही’ ‘शासनाची हिटलरशाही चालणार नाही’, असे घोषणा असलेले फलक या आमदारांच्या हातात होते. यामध्ये राजेश क्षीरसागर, सुजीत मिनचेकर, चंद्रकांत पाटील, सुरेश खाडे, चंद्रकांत मकोटे या सेना-भाजप आमदारांचा समावेश होता.
ते पवारांनाच माहीत- आव्हाड : दुर्बळ नेतृत्व असेल तर निवडणूक जिंकता येत नाही, असे वक्तव्य कृषी मंत्री शरद पवार यांनी केले आहे. शरद पवार यांचा इशारा सोनिया गांधी यांच्याकडे आहे काय? या प्रश्नाच्या उत्तरात आमदार  जितेंद्र आव्हाड यांनी हे त्यांनाच माहीत, असे सांगून सत्ता लोककल्याणासाठी राबवायची असते, हे शरद पवार यांना अभिप्रेत असल्याचे मत व्यक्त केले. काँग्रेसचे नेतृत्व दुबळे नाही, असेही ते म्हणाले.
आमदार साहेबराव पाटील बेमुदत उपोषणावर : जळगाव जिल्ह्य़ातील अमळनेरचे आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी त्यांच्या मतदार संघातील समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी विधिमंडळ इमारतीच्या पायऱ्यावरच बेमुदत उपोषण सुरू केले आहे. अमळनेर नगर परिषद क्षेत्रातील रहदारीच्या रस्त्यांवरील अनधिकृत बांधकामे, अवैध पार्कीग, प्रवासी वाहतूक, फेरीवाले व जाहिरात फलकांविरुद्ध आवश्यक कारवाई करावी, जिल्ह्य़ातील राजवड (आदर्शगाव) येथे माध्यमिक शाळेस अनुदान तत्वावर परवानगी द्यावी, सन २०१३-१४ या आर्थिक वर्षांतील भौतिक व आर्थिक नियोजनानुसार कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, पातोंडा येथील नाल्याचे सरळीकरण आणि ११२ सिमेंट साठवन बंधाऱ्यांचे त्वरित बांधकाम करावे, पारोळा तालुक्यातील भिलाली येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधकामाची ई-निविदा काढावी, या प्रमुख मागण्यांसाठी त्यांनी उपोषण सुरू करून शासनाचे लक्ष वेधले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा