अपंगांना दिले जाणारे ६०० रुपये मानधन अत्यंत तुटपुंजे असून त्यात वाढ करावी तसेच अपंगांना घरकुले देताना दारिद्र्यरेषेची अट काढून टाकावी या प्रमुख मागण्यांसाठी ऑगस्टमध्ये आंदोलन करण्याचा इशारा प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे संस्थापक आ. बच्चु कडू यांनी दिला आहे.
सामाजिक न्यायदिनानिमित्त अपंगांच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या शिवांजली बहुउद्देशीय कल्याणकारी सेवाभावी संस्थेचा उद्घाटन सोहळा येथे आ. कडू यांच्या हस्ते झाला. रिपाइंचे शहराध्यक्ष दिलीप नरवडे यांनी प्रास्तविक केले. सलीम सोनावाल, नितीन पाटील, रवींद्र थोरे, सुहास कांदे आदी उपस्थित होते. यावेळी गरजू अपंगांना तीन चाकी सायकलींचे वाटप करण्यात आले. नव्या शासकीय अध्यादेशाप्रमाणे अपंगांची नोंद आता गावागावात व खेडय़ांवर झाली आहे. मात्र पुनर्वसनासाठी कोणतेही ठोस प्रयत्न अद्याप झालेले नाही. कायम उपेक्षेची वागणूक त्यांच्या वाटय़ाला आली असल्याचे आ. कडू यांनी स्पष्ट केले. ऑगस्टमध्ये प्रहार अपंग क्रांती आंदोलनातर्फे विविध मागण्यांसाठी शेवटची लढाई सुरू केली जाईल. त्यात सर्वानी सहभागी होण्याचे आवाहन कडू यांनी केले. आगामी काळात जे मदतीला धावत येतील तोच आपला पक्ष व आपला धर्म ही भूमिका अपंगांनी ठेवावी. कोणाला पाडायचे व कोणाला निवडून आणायचे हे तुमच्या हातात आहे. झेंडय़ावर किंवा जातीवर मते देऊ नका. मतदारानेच आंदोलन उभे करावे असा सल्लाही त्यांनी दिला. सरकार बदलण्याची ताकद अपंगांमध्ये आहे. त्यांनी स्वत:ला एकटे समजू नये. प्रवाह क्रांती आंदोलन तुमच्यासोबत आहे. राजकारण न आणता अपंगाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ही संघटना शेवटपर्यंत कार्य करेल अशी ग्वाही कडू यांनी दिली.

Story img Loader