स्वामी विवेकानंद सार्थशती वर्षांनिमित्त ‘युगनायक’ हा डायनामिक डेस्टनीच्या वतीने साकारण्यात येत असून शीर्षक गीत आणि व्हीडिओ अल्बम तयार झाला आहे. ज्येष्ठ गीतकार गुलजार यांच्या हस्ते आगामी २२ सप्टेंबर ला नागपुरात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान त्याचे लोकार्पण होणार आहे, अशी माहिती प्रताप गुरुजी व डॉ. मनोज तत्ववादी यांनी दिली.
नागपूर महानगरपालिका, संत गजानन महाराज संस्थान आणि रामकृष्ण मठ यांच्या सहकार्याने डेस्टनीतर्फे ‘युगनायक’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. शहरातील ज्येष्ठ रंगकर्मी आणि गीतकार संजय जीवने यांनी शीर्षक गीत व पटकथा तयार केली असून डॉ. दत्ता हरकरे यांनी संगीत दिले आहे. गीते बॉलीवूडमधील आघाडीचे गायक शान यांनी गायिली आहेत. गीतकार गुलजार यांच्या आवाजात अल्बममधील निवेदन करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची संपूर्ण जबाबदारी आशुतोष गोवारीकर तसेच राजकुमार हिरानी यापैकी एकजण सांभाळणार असून संजय जीवने, प्रताप गुरुजी, शुभांगी भडभडे, स्वामी ब्रह्मस्थानंद आदी सहकार्य करणार आहे.
विविध भाषांमध्ये हा चित्रपट असावा, यासाठी प्रयत्न सुरू असून या चित्रपटाच्या निर्मितीसाठी ५ कोटींचा खर्च होणार आहे. चित्रपटातील पात्रांसाठी कलावंतांची निवड ऑडिशन्सच्या माध्यमातून झालेली आहे. वेबसाईटच्या माध्यमातून देशविदेशातील कलावंतांना स्वामी विवेकानंदांची भूमिका साकारण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. प्रत्यक्ष चित्रीकरणाला ऑक्टोबर महिन्यात सुरुवात करण्यात येणार आहे. चित्रीकरण फक्त ५० दिवसात पूर्ण करण्यात येणार असून रामटेक गडमंदिराच्या पायथ्याशी सेट उभारण्यात येत आहे आणि विदर्भाबरोबरच इतर ठिकाणीही चित्रीकरण करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपट विदर्भात साकारला जात आहे, असा संदेश या माध्यमातून देशभरात आणि विदेशात देण्याचा मानस असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा