वास्तवाशी साम्य असलेला सिनेमा पाहताना प्रेक्षकाला त्यातील घटनांचा स्वत:शी असलेला संबंध लावताना असे आपल्या बाबतीतही नक्कीच घडू शकते असे त्याला वाटत राहते आणि त्यामुळेही सिनेमा त्याला भावतो. ‘अनुमती’द्वारे दिग्दर्शकाने एका निवृत्त माणसाच्या आयुष्याची शोकान्तिका पडद्यावर साकारताना, अनेक भावनिक पदर नेमकेपणाने उलगडून दाखविताना प्रेक्षक समरस न झाला तरच नवल. विक्रम गोखले यांनी आपल्या अप्रतिम अभिनयाच्या जोरावर तोलून धरलेला हा सिनेमा आहे.
सुशिक्षित मराठी मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय समाजातील रत्नाकर पाठारे (विक्रम गोखले) यांचे कुटुंब, बायको-मुलांवर प्रेम करणारे पाठारे हे सारं सर्वसामान्यांसारखंच आहे. सुखी चौकोनी कुटुंबातील पाठारे यांची दोन्ही मुले श्रीकांत (सुबोध भावे) आणि माऊ (अनघा पेंडसे) यांची लग्ने झाली आहेत, त्यांना मुले आहेत, सगळे आनंदात सुरू आहे. रत्नाकर आणि त्यांची बायको मधु ऊर्फ माधवी (नीना कुलकर्णी) आपल्या बचतीमधून कोकणात घर बांधून आनंदाने राहू लागलेत. अचानक माधवीला मेंदूचा विकार जडतो आणि तिचा जीवन-मृत्यूचा संघर्ष सुरू होतो. आपल्या बायकोचा जीव वाचविण्यासाठी रत्नाकर पाठारे जिवाचे रान करतात. सगळी सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही या उक्तीला अनुसरून रत्नाकर पाठारे हतबल होतात, बायको जगली नाही तर आपण जगूच शकणार नाही, आयुष्यभर आपल्यासाठी आणि कुटुंबासाठी खस्ता खाणाऱ्या मधूला वाचवायलाच हवे या एकाच ध्येयाने पाठारे आपली धडपड सुरू ठेवतात.
एका निवृत्त व्यक्तीचा आपल्या प्रिय व्यक्तीचा जीव वाचविण्याचा प्रयत्न अशी गोष्ट म्हणता येईल. परंतु, जीवन-मृत्यूच्या उंबरठय़ावर असलेल्या प्रिय बायकोला जीवरक्षक प्रणालीवर ठेवलेले पाहताना होणाऱ्या वेदना, आयुष्यभरातील रम्य आठवणी, त्याआधारे रचलेली स्वप्ने आणि प्रत्यक्षात उतरविण्याचा जोडीने घेतलेला आनंद असा भूतकाळ आठवतानाही पाठारे हतबल होतात. स्वत:ची निवृत्तीनंतर मिळालेली पूंजी संपून जाते, मुलगा श्रीकांतचा तुटपुंजा पगार यामुळे श्रीकांत ‘डू नॉट रेसिस्युएट’ अर्थात डीएनआरचा अर्ज भरतो. त्यावर सही करण्याचा अधिकार रत्नाकर पाठारेंचा आहे. आपल्या बायकोला जगविण्यासाठी लावलेली कृत्रिम श्वासोच्छ्वास प्रणाली काढून घेऊन नैसर्गिकरीत्या तिला जगू देणे अशा स्वरूपाचा अधिकार डॉक्टरांना देणाऱ्या अर्जावर सही करायची की नाही असे द्वंद्वं रत्नाकर पाठारेंच्या समोर आहे. सबंध सिनेमा याभोवती फिरतो.
विक्रम गोखले यांनी पडद्यावर अप्रतिम साकारलेला रत्नाकर पाठारे सिनेमा पाहून परतल्यानंतरही प्रेक्षकाच्या मनात घर करून राहतो. बायको औषधांना प्रतिसाद देतेय एवढे जरी शब्द डॉक्टरांनी उच्चारले तरी किंचितसा उत्साह रत्नाकरला वाटतो, बायकोच्या हौसेखातर बांधलेले घर विकून तिचा जीव वाचविण्यासाठी पैसा मिळविण्याचा प्रयत्न त्या घरात गेल्यानंतर आठवणींनी व्याकूळ झालेला रत्नाकर पाठारे, मुलगा-मुलगी-जावई-सून यांचे वागणे, त्याचे मनावर होणारे परिणाम, अचानक कॉलेजची मैत्रीण अम्बू (रीमा) भेटल्यानंतर मनाला मिळणारी उभारी, बायको आजारी असल्याचे सुरुवातीला तिच्यापासून लपविणे, अम्बूचा नवरा गेला तेव्हाच्या तिने सांगितलेल्या आठवणी, त्याचा रत्नाकर पाठारेने लावलेला आपल्यापुरता अर्थ, जीवन क्षणभंगूर आहे इत्यादी इत्यादी छोटय़ा प्रसंगांतून विक्रम गोखले यांचा गहिरा अभिनय प्रेक्षकाचा ठाव घेतो. सर्वच सहकलाकारांनी भूमिकेबरहुकूम अभिनय केला आहे. ‘वाट संपली आहे मी उगाच चालत राहतो’ या गीताच्या ओळी चित्रपटगृहातून परतल्यानंतरही प्रेक्षकाच्या मनात घोळत राहतात. दिग्दर्शकाला दिग्गज छायालेखकाच्या कलात्मक चित्रचौकटींची मिळालेली जोड यामुळेही सिनेमा लक्षात राहतो.
नवलखा आर्ट्स मीडिया एण्टरटेन्मेंट,
होली बेसिल प्रॉडक्शन्स प्रस्तुत
अनुमती
कथा-पटकथा-संवाद-दिग्दर्शन-गीते-संगीत – गजेंद्र अहिरे
छायालेखन – गोविंद निहलानी
कलावंत – विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, रीमा, सुबोध भावे, सई ताम्हणकर, किशोर कदम, अरुण नलावडे, अनघा पेंडसे, आनंद अभ्यंकर, रोहन मंकणी