पु. ल. देशपांडे यांच्या गाजलेल्या कथेवर आधारित चित्रपट करताना दिग्दर्शक-लेखकाने केलेला कथा-विस्तार आणि घेतलेले स्वातंत्र्य यामुळे चित्रपट रंजक करण्यात दिग्दर्शकद्वयी यशस्वी ठरली आहे. परंतु, मूळ कथेतील सगळी पात्रे, त्यांचे वर्णन आणि उडणारे हास्याचे फवारे याबद्दल अथपासून इतिपर्यंत सर्व काही प्रेक्षकांना माहीत असूनही पडद्यावर ही कथा साकारण्याचे आव्हान पेलण्यातही दिग्दर्शक थोडय़ाफार प्रमाणात यशस्वी झाले आहेत असे म्हणावे लागेल. परंतु, कथा वाचताना येणारी गंमत चित्रपट पाहताना येईलच असे नाही. स्पेशल ग्राफिक्स, थ्रीडी तंत्रज्ञानाचा चांगला वापर चित्रपटात केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कथा-विस्तार केल्यामुळे मूळच्या कथेचा संवादांवर असलेला भर, वेगवेगळ्या स्वभावाच्या, स्तरातल्या व्यक्तिरेखांचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न दिग्दर्शकद्वयांनी बदलला आहे. परंतु, हे बदल करताना मूळ ढाचाला धक्का पोहोचणार नाही याची काळजी घेतली आहे हे चित्रपट पाहताना जाणवते.

म्हैस ही कथा प्रेक्षकांच्या चांगलीच स्मरणात आहे. त्याबरहुकूम व्यक्तिरेखा साकारताना अनेक बदलही लेखक-दिग्दर्शकाने केले आहेत. वेगवेगळे ‘ट्रॅक’ जोडले आहेत. त्यामुळे चित्रपट रंजक झाला आहे. एकाच म्हशीवर तिघांनी घेतलेले कर्ज, त्यामुळे निर्माण झालेला गुंता, म्हैस एसटीखाली आल्यानंतर उडालेला गोंधळ, अनेक इरसाल व्यक्तिरेखांनी आपल्या संवादांतून निर्माण केलेला गोंधळ, उपोषणकर्त्यांची एसटी, मराठी शाळा वाचविण्याच्या मुद्दय़ावर स्थानिक पुढाऱ्याने मुंबईला जाऊन उपोषण करायला जाण्याची टूम, त्याचा फायदा घेऊन गावातील अनेकांनी वेगवेगळ्या कारणांनी मुंबईला जाण्याचा आखलेला बेत या सगळ्यामुळे विनोदी चित्रपटाला आवश्यक अशी वातावरणनिर्मित दिग्दर्शकांनी चांगली जुळवली आहे. कोकणातल्या गावकऱ्यांची तऱ्हा, लकबी दाखविण्याचा प्रयत्न केल्यामुळेही हसवणूक होते.

परंतु, मूळ कथा वाचताना होणारी हास्यनिर्मिती चित्रपट करू शकत नाही. तरीही ग्राफिक्सच्या तंत्रज्ञानाने बनलेली म्हैस, वेगवेगळ्या व्यक्तिरेखांची चित्रे सुरुवातीला पडद्यावरून दाखवत केलेली दमदार सुरुवात, त्याला संगीताची उत्तम जोड, पु. ल. देशपांडे यांच्या दर्शनाने घडविला जाणारा शेवट यामुळे चित्रपट रंजक ठरतो.

 

प्रभाकर फिल्म्स बॅनर

चांदी

निर्माते – ज्ञानेश्वर गोवेकर

दिग्दर्शक – समीर नाईक, ज्ञानेश्वर गोवेकर

कथा – पु. ल. देशपांडे

कथा विस्तार-पटकथा-संवाद – अनिल पवार

छायालेखक – समीर आठल्ये

थ्रीडी-स्पेशल ग्राफिक्स – आशीष गंर्धे, अनिल जाधव, सिद्धेश जाधव, अमित

संगीत – प्रवीण कुवर

गीते – मीना गोविंद

कलावंत – वैभव मांगले, चेतन दळवी, भालचंद्र कदम, विकास समुद्रे, संतोष पवार, दीपक शिर्के, संजीवनी जाधव, किशोरी अंबिये, किशोर नांदलस्कर, रमेश देव, गणेश दिवेकर, रुपाली भोसले, आशीष राणे, प्रभाकर मोरे, राजश्री निकम, कस्तुरी सारंग, संदेश उपश्याम.

मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Movie review chandi marathi movie