हिंदीच्या रुपेरी पडद्यावर अनेक वेगवेगळ्या विषयांचे चांगले चित्रपट अधूनमधून झळकत असले तरी तद्दन सरधोपट पद्धतीची कास बॉलीवूडने सोडलेली नाही. नवीन चेहऱ्यांना घेऊन घिसापिटा फॉम्र्युला दाखविण्याचे प्रयत्न सर्रास केले जातातच. ‘रब्बा मैं क्या करू’ हा चित्रपट यापैकीच एक म्हणावा लागेल. बॉलीवूडवर पंजाबी ठसा नेहमीच दिसत आलाय. त्यामुळे पंजाबी पद्धतीचे गर्भश्रीमंती लग्नसोहळा हा चित्रपटाचा विषय होतो. या चित्रपटातही असा लग्नसोहळा दाखविताना त्याबाबत अर्शद वार्सीच्या संवादांतून भाष्य करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केलाय. थाटामाटातील लग्नसोहळे आणि वऱ्हाडी मंडळींचे आगतस्वागत वगैरे सगळा ‘अजूबा’ असल्याचे संवाद सोडले तर सबंध चित्रपट सरधोपट पद्धतीने दाखविण्याचा चित्रपटकर्त्यांनी चंग बांधलाय. कल्पनाशून्यता आणि नाटय़पूर्णतेचा अभाव यामुळे प्रेक्षक न कंटाळला तरच नवल असा हा सिनेमा आहे.
साहील आणि स्नेहा या प्रमुख व्यक्तिरेखा आहेत. लहानपणापासून एकत्र वाढल्यामुळे म्हणे त्यांचे प्रेम जुळते आणि लग्न ठरते. लग्न एक आठवडय़ावर येऊन ठेपल्यावर अर्शद वार्सी साहीलला ‘फ्लर्टिग’चे धडे देतोय. ‘फॉर हॅपी लाइफ चीट युवर वाइफ’ हा अर्शद वार्सीचा संवाद चित्रपटाचे एका ओळीचे कथानक सांगतो. अर्शद वार्सी नवोदित आकाश चोप्राला लग्नापूर्वी आणि लग्नानंतर बायकोची फसवणूक कशी करायची त्याचे नियम सांगतो आणि आकाश चोप्रा म्हणजे साहील त्याप्रमाणे वागत राहतो. मग एकदम शेवटी अर्शद वार्सी स्वत:च्या बायकोची म्हणजे रिया सेनची माफी मागतो आणि आपला फॉम्र्युला चुकीचा असल्याचे आकाशलाही पटवून देतो आणि साहील-स्नेहा यांचे लग्न लावून सिनेमा एकदाचा संपतो.
परेश रावल, टिनू आनंद, शक्ती कपूर हे आकाश चोप्राचे मामा, काका दाखविले असून त्यांनी साकारलेल्या बावळट व्यक्तिरेखांच्या माध्यमातून निर्माता-दिग्दर्शकांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. या व्यक्तिरेखांद्वारे विनोदनिर्मिती करण्यासाठी त्यांना स्त्रीलंपट दाखविण्यात आलेय. रावल, टिनू आनंद, शक्ती कपूर यांच्या माकडचेष्टा सिनेमाभर प्रेक्षकाला सहन कराव्या लागतात. नायिका लग्नाच्या आधीच नायकाला सोडून जाते आणि मग बॉलीवूडचा नायक नायिकेची मनधरणी करतो आणि मग ते सुखाने नांदू लागतात असे तकलादू कथानक आणि त्याला निर्थक गाण्यांची जोड आणि नाटय़पूर्णतेचा संपूर्ण अभाव पडद्यावर बघत असताना उत्कंठारहित स्थितीमध्ये प्रेक्षकाला कधी एकदा संपणार सिनेमा याची वाट पाहायला लावतो. प्रेक्षकाला हसविण्याचे निर्थक प्रयत्न परेश रावल, शक्ती कपूर, टिनू आनंद यांच्या व्यक्तिरेखा करतात. ताहिर कोचर आणि आकाश चोप्रा ही नवी जोडी बाकी चित्रपटाचा फॉम्र्युला जुनाच असा हा चित्रपट दिग्दर्शकाची कीव करत पाहत बसण्याची वेळ प्रेक्षकावर आणतो.
रब्बा मैं क्या करू
निर्माता – मोती सागर
दिग्दर्शक – अमृत सागर चोप्रा
संगीत – सलीम सुलेमान
कलावंत – अर्शद वार्सी, आकाश चोप्रा, परेश रावल, राज बब्बर, रिया सेन, शक्ती कपूर, ताहिर कोचर, हिमानी शिवपुरी, अनुराधा पटेल, टिनू आनंद

 रवींद्र पाथरे