रोजच्या जगण्यात दैनंदिन नैमित्तिक कामे करतानाही थोडासा विरंगुळा म्हणून महानगरातील प्रत्येकजण काही तरी छंद जोपासतो. समुद्रकिनाऱ्याजवळ नोकरीचे ठिकाण असूनही कधीच किनाऱ्यावर दोन घटका न विसावणारी, सतत घडय़ाळ्याच्या काटय़ावर वागणारी महानगरांतील माणसे, त्यांचे वैयक्तिक आयुष्य, नोकरीवरून घरी जाताना करावे लागणारे आधी लोकलचे आणि नंतर बस प्रवासाचे दिव्य हे जगणे दाखवितानाच दोन कधीही न भेटलेल्या व्यक्तींमधील देवाणघेवाणीतून त्यांचे विचार, त्यांचे आयुष्य, त्यांचा दृष्टिकोन मांडणारा ‘दी लंच बॉक्स’ हा चित्रपट नकळतपणे काही तरी सांगतो. चित्रपट संपला तरी एक निराळेच कथानक प्रेक्षकाच्या मनात रुंजी घालत राहते.
सर्वसामान्य नोकरदारांचे दैनंदिन आयुष्य आणि एका सर्वसामान्य शहरी गृहिणीची सरधोपट रोजचे नैमित्तिक जगणे यातले साम्य-भेद, मनुष्यस्वभावाचे पैलू, महानगरीय धकाधकीच्या गर्दीतील माणसाचे एकटेपण असे सगळे सर्वसामान्य आणि म्हटले तर रोजच्या जगण्यातील तोचतोचपणाला कंटाळलेल्या दोन व्यक्तीचे समांतर तरीही सारखे जगणे दाखविणारा हळुवार सरळ साध्या ‘द लंच बॉक्स’ चित्रपटातून नकळतपणे दिग्दर्शक दोन व्यक्तींची मानसिक आंदोलने, मनातील विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यात यशस्वी ठरतो.
मोबाइलच काय, साधे टेलिफोनसुद्धा नव्हते तेव्हा नवऱ्याला डबेवाल्यांमार्फत पाठविलेल्या डब्यातून गृहिणी एखादी महत्त्वाच्या निरोपाची चिठ्ठी पाठवत असे. या चित्रपटातही साजन फर्नाडिस आणि इला यांच्यात अशी चिठ्ठय़ांची देवाणघेवाण होत राहते आणि त्यांचे अंतरंग उलगडत जाते.
चित्रपटाची पूर्वप्रसिद्धी आणि झलक पाहिल्यानंतर ही प्रेमकथा आहे असे सहजपणे वाटले तरी ही प्रेमकथा नाही. दिग्दर्शकाने अनोख्या पद्धतीने दोन व्यक्तींच्या आस-निरास आणि इच्छा-आकांक्षांची, स्वभावांची झलक दाखवितानाच अनोळखी व्यक्तींशी ओळख झाल्यानंतर विशेषत: स्त्री-पुरुषांची एकमेकांशी ओळख झाल्यानंतर पहिल्या भेटीत एकमेकांविषयीची मूलभूत माहिती करून घेण्याची घाई असते. वास्तविक त्या वैयक्तिक माहितीची अनेकदा एकमेकांना गरज असतेच असे नाही. परंतु ओळख वाढविण्याच्या हेतूने केलेली ही सुरुवात असते. डबेवाले चुकीने भलत्याच व्यक्तीने पाठविलेला डबा तिसऱ्याच कुणाला तरी देतात आणि त्यातून एकटय़ा असलेल्या दोन जिवांची देवाणघेवाण, चिठ्ठय़ांमार्फत होणाऱ्या गप्पा यांतून चित्रपट उलगडत जातो. हा प्रकारच हिंदी सिनेमात अलीकडे पाहायला मिळत नाही. त्यामुळे दिग्दर्शकाच्या या अनोख्या कथानकाची वैशिष्टय़पूर्ण मांडणी प्रेक्षकाला तद्दन बॉलीवूडपटाच्या सहजपणे पलीकडे नेते. दैनंदिन जगण्यावरचा चित्रपट कोणताही फिल्मी मुलामा न देताही सरळ साधा असूनही हळुवार पद्धतीने भाष्य करतो याची प्रेक्षकाला जाणीव करून देतो.
इरफान खानसारख्या कलावंताने आतापर्यंतच्या त्याच्या अभिनयशैलीपेक्षा वेगळ्या पद्धतीने अभिनय करून भूमिका रंगवली आहे. निम्रत कौरने साकारलेली इला भाव खाऊन जाते, चित्रपट संपल्यावर लक्षात राहते, मनात रेंगाळत राहते. याला नवाझुद्दीन सिद्दिकीने सहजपणे साकारलेल्या शेख या व्यक्तिरेखेची उत्तम जोड मिळाली आहे.
काही वेळा दैनंदिन जगणे पाहण्याचा प्रेक्षकाला कंटाळा येतो. पण इला आणि फर्नाडिस यांच्या नात्याचे आता काय होणार, शेखचे काय होणार, हे तिघे कोणत्या दिशेने जातील याची उत्कंठा टिकून राहते. म्हणूनच चित्रपट यशस्वी ठरतो.
दी लंच बॉक्स
निर्माते – अनुराग कश्यप, गुनित मोंगा, अरुण रंगाचारी.
लेखक-दिग्दर्शक – रितेश बात्रा.
छायालेखक – मायकल सिमॉण्ड्स.
संगीत – मॅक्स रिश्टर.
कलावंत – इरफान खान, निम्रत कौर, नवाझुद्दिन सिद्दिकी, लिलिट दुबे, भारती आचरेकर, डेन्झिल स्मिथ, नकूल वैद, यश्वी पुनीत नागर व अन्य.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा